Home ताज्या बातम्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘बार्टी’च्या मोबाईल ॲप्लिकेशनचे होणार...

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘बार्टी’च्या मोबाईल ॲप्लिकेशनचे होणार लोकार्पण – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

81
0

पुणे, दि. ११ डिसेंबर २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ‘महाशरद’ या दिव्यांग सहाय्यक उपकरणासंबंधीच्या ॲप्लिकेशन सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) चे ‘ई-बार्टी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन (E-Barti mobile app) तयार केले आहे. उद्या १२ डिसेंबर रोजी याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. मुंडे म्हणाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ‘बार्टी’ संस्था कार्यरत असून याअंतर्गत शैक्षणिक विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. डिजिटल युगात राज्यात स्मार्टफोन मोबाईलधारकांची संख्या कोट्यवधीच्या घरात असून, ‘बार्टी’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांना कमीत कमी वेळेत, आपल्या मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळावी या दृष्टीने हे ॲप तयार केले असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

एम-गव्हर्नन्सद्वारे बार्टीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना येरवडा शाळेत दिले जाणारे मोफत प्रवेश आदी सर्व बाबींचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ई -‘बार्टी’ या ॲपमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू करून त्यात शासनाचे अहवाल, सामाजिक न्याय विभागाशी निगडित साहित्य, राज्यातील पुरोगामी समाजसुधारकांचे विचार व साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियादेखील या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ॲप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

ऑनलाईन तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधा उपलब्ध असलेल्या ॲपमुळे किती प्रमाणात जनतेला विविध योजनांचा लाभ मिळत आहे याची आकडेवारीही यातून स्पष्ट होणार आहे.

‘बार्टी’चे कामकाज पूर्ण क्षमतेने वाढवावे, सामान्य व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक योजना मोबाईलवर पोचवावी या उद्देशाने व खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे ॲप लोकार्पित होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मजोती गजभिये उपस्थित होते.

 

Previous article14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
Next articleलोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्धाचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + 14 =