नागपुर,दि.26 सप्टेबर 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-“कोविड -19 चा नागपूरात वाढता प्रादुर्भावामुळे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती च्या माध्यमातुन होणारे या वर्षीचे दिक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दिक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी भीमसैनिकांच्या गर्दीमुळे कोरोना संबंधी सुचनांचे पालन करणे जवळपास अशक्य आहे. गर्दीत एखादा लक्षणहीन कोरोना बाधित आल्यास सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात टाकणे हे उचीत नसुन.खबरदारीचा उपाय म्हणून दिक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.” अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवली आहे.तसेच, सर्व भिमसैनिक 14 ऑक्टोबर आणि अशोक विजयादशमी, 25 ऑक्टोबर, 2020 रोजी आपल्या घरीच बौद्धवंदना घेऊन डाॅ.बाबासाहेबांना अभिवादन करावे. दिक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोणताच कार्यक्रम होणार नाही व दुकानांना सुद्धा परवानगी देता येणार नाही याची सर्व बांधवांनी नोंद घ्यावी. आपल्या सर्व बांधवांचे आरोग्य लक्षात घेता सहकार्य करावे . फक्त स्मारक समितीचे पदाधिकारी शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करून व योग्य ती दक्षता घेऊन बाबासाहेबांना यथोचित मानवंदना देण्यात येईल.असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशभरातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी दाखविण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील २३ सप्टेंबर रोजी एकूण रुग्णसंख्या ६७,६७१ तर मृतांची संख्या २,२०५ होती. आज यात १,१२६ नव्या रुग्णांची तर ४४ मृत्यूची भर पडली. त्यानुसार रुग्णसंख्या ६८,७९७ व मृतांची संख्या २,२४९ होणे अपेक्षित होते. परंतु आज रुग्णांची एकूण संख्या ७१,६१६ तर मृतांची संख्या २,२६१ वर पोहचली. विशेष म्हणजे, रुग्णसंख्येतील घोळ मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांच्यात एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी असतानाही वेळीच याकडे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे आता कोरोनाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे.