नवी दिल्ली,दि. 25 सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महामार्ग बांधण्याचा वेग वाढविण्यासाठी तसेच त्याच्यासंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHBF अर्थात राष्ट्रीय महामार्ग निर्माते महासंघाकडून आलेल्या बहुतांश सूचनांना मान्यता दिली आहे. कोविड उपाय, लिलाव प्रक्रिया, कंत्राट व्यवस्थापन, नवीन आणि जुने मॉडेल ईपीसी करार, हायब्रीड ऍन्युइटी मॉडेलच्या सवलत करारातील सुधारणा, ‘BOT म्हणजे बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ याच्या सवलत करारातील सुधारणा आणि प्रकल्प तयारी अशा नऊ क्षेत्रांसंबंधी सूचना यात करण्यात आल्या होत्या.
NHBFकडून आलेल्या सूचनांचा सखोल विचार करून त्यानंतर प्राधिकरणाने 25 सूचनांना मान्यता दिल्याचे NHAI ने म्हटले आहे. भविष्यातही सर्व चांगल्या सूचनांचा चांगल्या पद्दतीने विचार होईल अशी ग्वाही NHAI ने दिली आहे.
धोरणाशी संबंधित बाबींवरच्या सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे विचारार्थ पाठविण्यात आल्याचेही NHAI ने स्पष्ट केले आहे.
NHAI ने मान्य केलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे-:
- कोरोना उपाययोजनांबद्दल- कंत्राटदारांना अधिक खर्च अगर दंड न लावता, बांधकामासाठी दिलेल्या मुदतीत प्रकल्प संचालक तीन महिन्यांपर्यंत वाढ करतील आणि तीन ते सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ प्रादेशिक अधिकारी देतील.
- लिलावाच्या वेळी रस्त्याच्या स्थितीबद्दल मूल्यमापन, बोली लावणाऱ्याला करता यावे यासाठी, NHAI त्यांना DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल, नेटवर्क सर्वेक्षण वाहन आणि आवश्यक ती माहिती पुरवेल. DPR सल्लागारांनी गोळा केलेली सर्वेक्षणाची सगळी माहिती सर्व संबंधित संस्थांना ‘डेटा लेक’ च्या माध्यमातून एका मंचावर उपलब्ध करून दिली जाईल.
- वेंडर्सना वेळेवर पैसे देता येण्यासाठी आणि योग्य पद्धतीने देखरेख करण्यासाठी प्रकल्पाचे पैसे देण्यासंबंधीची देयके PMS/Data Lake Portal च्या माध्यमातून भरली जावीत.
यापूर्वी कंत्राटदार आणि सल्लागारांना पाठबळ देण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले असून त्यामुळे रस्ते क्षेत्रात लिलावासाठी बोली लावणाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होण्यास मदत झाली असल्याचे NHAI ने म्हटले आहे. मार्च 2020 मध्ये NHAI ने 10 हजार कोटी रुपये ऑनलाइन भरणा करण्याच्या माध्यमातून वितरित केले आणि लॉकडाउनच्या काळात कार्यालय बंद असण्यामुळे कोणतेही पैसे देणे बाकी राहणार नाही, याची खबरदारी घेतली. चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत NHAI ने 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम व्हेंडर्सना वितरित केली. शिवाय, कंत्राटदारांना दरमहा पैसे देण्यासारखी पावलेही उचलून त्यांना रोख रक्कम मिळण्याची काळजी घेतली गेली. अशा उपायांमुळे रस्ते क्षेत्रात विकासाला मदत झाली असल्याचेही NHAI ने म्हटले आहे.