Home ताज्या बातम्या राम मंदिर:-अयोध्‍येत श्री राम मंदिर भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

राम मंदिर:-अयोध्‍येत श्री राम मंदिर भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

112
0

 

सर्वप्रथम माझ्याबरोबर प्रभूराम, माता जानकी यांचे समरण करूया.

सियावर रामचंद्र की जय! जय सियाराम!

अयोध्या,दि.5 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  आज हा जयघोष केवळ सियारामच्या नगरीतच ऐकू येत नाही तर याचे पडसाद सम्पूर्ण जगभरात ऐकू येत आहेत. सर्व देशवासियांना आणि जगभरातील कोट्यवधी भारतभक्त, रामभक्तांचे या पवित्र प्रसंगी कोटी-कोटी अभिनंदन करतो.

मंचावर उपस्थित उत्तर प्रदेशचे उर्जावान, यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ जी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, परमपूज्य नृत्यगोपाळदासजी महाराज आणि आपले सर्वांचे श्रद्धेय आदरणीय मोहन भागवतजी, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले तपस्वी गण, देशातील सर्व नागरिक, मला आज येथे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने मला राममंदिराच्या भूमिपूजन समारंभाला आमंत्रित केले हे माझे सौभाग्य आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली याबाबदल मी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मनापासून आभार मानतो.आणि  इथे येणे स्वाभाविकच होते. कारण ‘रामकाज किनो विनो मोहित कहा बिसराल’, भारत आज भगवान भास्काराच्या सान्निध्यात  शरयू  किनारी एक सुवर्ण अध्याय रचत आहे. कन्याकुमारीपासून क्षीरभवानी पर्यंत, कोटेश्वर पासून कामाख्यापर्यंत,  जगन्नाथपासून  केदारनाथपर्यंत, सोमनाथ ते काशी विश्वनाथ पर्यंत, सम्मेत शिखर ते श्रवणबेळगोळ , बोधगया ते सारनाथ पर्यंत  अमृतसर साहिब पासून पाटणा साहिब पर्यंत, अंदमान पासून अजमेर, लक्षद्वीप पासून लेह पर्यंत आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे. प्रत्येक मन दीपमय आहे. आज संपूर्ण भारत भावुक आहे. शतकांपासूनची प्रतीक्षा आज समाप्त होत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल कि आज त्यांच्या हयातीत हा पवित्र दिवस त्यांना पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे ताटकळत राहिलेल्या आपल्या रामलल्ला साठी आता भव्य मंदिर बांधले जाईल. तुटणे आणि पुन्हा उभे राहणे शतकांपासून चाललेल्या या व्यतीक्रमापासून रामजन्मभूमी आज मुक्त होत आहे.  माझ्याबरोबर पुन्हा म्हणा- जय सियाराम.

मित्रानो, आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी अनेक पिढ्यानी आपले सर्वस्व समर्पित केले होते, गुलामगिरीच्या काळात अशी कुठलीही वेळ नव्हती जेव्हा स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नसेल, देशातील कुठलाही भूभाग असा नव्हता जिथे स्वातंत्र्यसाठी बलिदान दिले नाही.  ऑगस्टचा 15 दिवस  लाखो बलिदानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यची उत्कट इच्छा, भावनेचे  प्रतीक आहे. अगदी त्याचप्रमाणे राममंदिरासाठी अनेक शतके, अनेक पिढ्यानी अखंड अविरत एकनिष्ठ प्रयत्न  केले.. आजचा  दिवस त्या तप  त्याग संकल्पाचे प्रतीक आहे. राममंदिरासाठी झालेल्या आंदोलनात अर्पण होते, तर्पण होते. संघर्ष होता, संकल्पही होता. ज्यांच्या बलिदान, त्याग आणि संघर्षामुळे आज हे स्वप्न साकारत आहे. ज्यांची तपस्या राममंदिरात  जोडली गेली आहे, मी त्या सर्व लोंकाना 130 कोटी देशबांधवांच्या वतीने नतमस्तक होऊन वंदन करतो.

संपूर्ण सृष्टीची ताकद राम जन्मभूमी पवित्र आंदोलनाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, जो जिथे आहे, हे आयोजन पाहत आहे. तो भावुक आहे. सर्वाना आशीर्वाद देत आहे. मित्रानो, राम आपल्या मनात वसले आहेत. आपल्यात मिसळले आहेत, कुठलेही काम करायचे असेल तर आपण भगवान रामाकडे पाहतो. तुम्ही भगवान  राम यांची अद्भुत शक्ती पाहा. इमारती नष्ट झाल्या, कायकाय झाले नाही, अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र  राम आपल्या मनात वसले आहेत. आपल्या संस्कृतीचा आधार आहे. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर रामचे भव्य मंदिर उभारण्यासाठी आज भूमिपूजन झाले. इथे  येण्यापूर्वी मी हनुमान गढीचे दर्शन घेतले. रामाची सर्व कामे  हनुमान तर करतात.  रामाच्या आदर्शांची कलियुगत रक्षण करण्याची जबाबदारी हनुमानावर आहे. म्हणूनच हनुमानाच्या आशिर्वादाने राममंदिर भूमिपूजनाचे आयोजन सुरु झाले. राममंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. मी मुद्दाम आधुनिक शब्दप्रयोग करत  आहे. आपल्या शाश्वत आस्थेचे प्रतीक बनेल, आपल्या राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनेल. हे मंदिर कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्पशक्तीचे देखील प्रतीक बनेल. हे मंदिर भावी पिढ्याना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील. हे मंदिर बनल्यानंतर अयोध्येची केवळ  भव्यता वाढणार नाही तर संपूर्ण अर्थतंत्र देखील बदलेल. इथे प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील.,प्रत्येक क्षेत्रात संधी वाढतील. विचार करा, जगभरातून लोक इथे येतील, प्रभुरामांचे, जानकीमातेचे दर्शन घयायला येतील. काय काय बदलेल इथे. मित्रानो, राममंदिराची ही प्रक्रिया राष्ट्राला जोडणारा उपक्रम आहे, हा महोत्सव आहे विश्वासाला  विद्यमानाशी जोडणारा,  नराला नारायणाशी जोडणारा , ‘लोक’ ला आस्थेशी जोडणारा . वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारी आणि स्व ला संस्काराशी जोडणारा आहे. आजचा हा ऐतिहासिक क्षण अनेक   युगे भारताची ऐतिहासिक कीर्तीपताका फडकावत ठेवेल.  आजचा दिवस कोट्यवधी रामभक्तांच्या संकल्पाच्या सत्यतेचे प्रमाण आहे. आजचा हा  दिवस सत्य, अहिंसा आस्था आणि बलिदानाला न्यायप्रिय भारताची एक अनुपम भेट आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाचा हा कार्यक्रम अनेक मर्यादांचे पालन करत होत आहे.  श्रीरामाच्या कामात मर्यादेचे जसे उदाहरण सादर व्हायला हवे  देशाने तसेच उदाहरण प्रस्तुत केले . याच  मर्यादेचा अनुभव आपण तेव्हाही घेतला,  जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपला ऐतिहासिक निर्णय दिला होता.

मित्रहो, या मंदिरामुळे नवा इतिहास घडवला जात नाही तर इतिहास स्वतःची पुनरुच्‍चार करत आहे. ज्याप्रमाणे छोट्या छोट्या गोपाळानी भगवान श्री कृष्ण द्वारा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी मोठी भूमिका बजावली ज्याप्रमाणे मावळे छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्‍या स्वराज्य स्थापनेचे निमित्त बनले, ज्याप्रमाणे विदेशी आक्रमका विरोधातल्या लढाईत गरीब मागास महाराज सुहेल देव यांच्या समवेत राहिले. ज्याप्रमाणे दलित, मागास, आदिवासी समाजाच्या प्रत्येक वर्गाने स्वातंत्र्याच्या लढ्यात

गांधीजींना सहयोग दिला, त्याचप्रमाणे आज देशभरातल्या लोकांच्या सहयोगाने आज ,राम मंदिर निर्मितीचे हे पुण्य कार्य सुरु झाले आहे.  आपण जाणतो ज्याप्रमाणे दगडावर श्रीराम लिहून लिहून रामसेतू निर्माण झाला त्याप्रमाणेच घराघरातून गावा गावातून श्रद्धापूर्वक पूजन केलेल्या शीळा इथे उर्जेचा स्त्रोत बनल्या आहेत. देशभरातली धामे आणि  मंदिरातून आणलेली मृत्तिका  आणि नद्यांचे पवित्र जल तिथल्या लोकांची संस्कृती, तिथल्या लोकांच्या भावना इथली अमोघ शक्ती बनली आहे. खरोखरच हे न भूतो न भविष्यती आहे. भारताची श्रद्धा, भारताच्या लोकांची सामुहिकता आणि या सामुहीकतेची   अमोघ शक्ती संपूर्ण दुनियेसाठी  अध्ययनाचा विषय आहे. शोधाचा विषय आहे. मित्रहो, श्री रामचंद्र यांना तेजामध्ये सूर्य समान, क्षमेमध्ये पृथ्वी तुल्य,बुद्धी मध्ये बृहस्पती सदृश,आणि यशामध्ये इंद्रासमान मानले गेले आहे. श्रीराम यांचे चरित्र सर्वात अधिक ज्या केंद्र बिंदूभोवती फिरते ते आहे  सत्यावर ठाम राहणे. म्हणूनच श्रीराम संपूर्णआहेत.  म्हणूनच, श्रीराम हजारो वर्षापासून भारतासाठी प्रकाश स्तंभ राहिले आहेत. श्रीराम यांनी सामाजिक समरसतेला आपल्या शासनाचा आधार स्तंभ बनवला.त्यांनी गुरु वशिश्ठ यांच्याकडून ज्ञान,शबरीकडून मातृत्व,हनुमानजी आणि वनवासी बंधूंकडून सहयोग,आणि  प्रजेकडून विश्वास प्राप्त केला. आगदी एका खारीचे महत्वही त्यांनी सहज स्वीकारले.त्यांचे अद्भुत व्यक्तित्व, त्यांची  वीरता उदारता, सत्यनिष्ठा,धैर्य,दृढता  त्यांची  दार्शनिक दृष्टी युगानुयुगे प्रेरित करत राहील. राम  प्रजेवर एक समान रूपाने प्रेम करत आले मात्र गरीब आणि दीन दुःखी यांच्यावर त्यांची विशेष कृपा राहते.म्हणूनच माता सीता श्रीराम जी यांच्यासाठी म्हणते,दिन दयाल  ब्रीद संभाली  म्हणजे जो दीनआहे,  दुःखी आहेत्याच्या साठी श्रीराम आहेत. मित्रहो, जीवनाचा असा कोणताही पैलु  नाही जिथे राम प्रेरणा देत नाही भारताची असी कोणती भावना नाही  ज्यात प्रभू राम यांचे दर्शन  घडत नाही भारताच्या आस्थे मध्ये राम आहे, भारताच्या आदर्शात राम आहे, भारताच्या दिव्यतेत राम आहे,भारताच्या तत्वज्ञानात राम आहे. हजारो वर्षापूर्वी  वाल्मिकी रामायणात जे राम प्राचीन भारताचे दर्शन घडवत होते, जे राम मध्य युगात तुलसी कबीर आणि  नानक यांच्या माध्यमातून  भारताला बळ देत होते तेच राम स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळात  बापूंच्या भजनात  अहिंसेची शक्ती बनून उपस्थित होते.  तुलसदासाचे राम सगुण तर नानक आणि कबीर यांचे राम निर्गुण राम आहेत.भगवानबुद्ध हि रामाशी जोडलेले आहेत, शतकापासून ही अयोध्या नगरी जैन धर्माच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. रामाची हीच सर्व व्यापकता भारताच्या विविधतेत एकतेचे जीवन चरित्र आहे. तमिळ मध्ये कंबन रामायण  तेलगु मध्ये रंगनाथ रामायण आहे तर उडिया मध्ये रुइपात कातेड  पदी रामायण आहे तर कन्नडा मध्ये कुम्देंदू रामायण आहे, आपण काश्मीर मध्ये गेलात तर आपल्याला रामावतार चरित मिळेल मलयाळम मध्ये रामचरितममिळेल बंगाली मध्ये कृतीवास रामायण आहे, तर. गुरु गोविंद सिंह यांनी स्वतः गोविंद रामायण लिहिले आहे. वेग वेगळ्या रामायणात वेग वेगळ्या ठिकाणी  ठिकाणी राम भिन्न भिन्न रुपात आढळतील मात्र  राम सर्व स्थळी आहेत राम सर्वांसाठी आहेत म्हणूनच राम भारताच्या अनेकतेतल्या एकतेचे सूत्र आहेत, जगात अनेक देश राम नामला वंदन करतात. तिथले नागरिक स्वतः ला श्रीरामाशी जोडलेले मानतात. जगातली सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या ज्या देशात आहे तो देश आहे इंडोनेशिया, तिथे आपल्या देशाप्रमाणे काकावीन रामायण योगेश्वर रामायण अशी अनेक आगळी रामायण आहेत. राम आजही तिथे पूजनीय आहेत कंबोडिया मध्ये रमकेररामायण आहे, लाव मध्ये फलक फालाक रामायण आहे, मलेशिया मध्ये हिकायत  सेरी राम, आपल्याला इराण आणि चीन मध्ये ही राम जीवनातले प्रसंग आणि राम कथा विवरण आढळेल. श्रीलंका मध्ये रामायण कथा जानकी हरण या नावाने ऐकवली जाते. नेपाळ चा तर रामाशी आत्मीयतेचा सबंध माता जानकीशी जोडलेला आहे असेच जगात किती देश आहेत जिथे आस्थेमध्ये, भूतकाळाशी राम कोणत्या ना कोणत्या रुपात वसलेले आहेत. आजही भारताबाहेर अनेक देश आहेत तिथे तिथल्या भाषेत   रामकथा आजही प्रचलित आहेत. मला विश्वास आहे की आज या देशातही करोडो लोकांना राम मंदिर निर्मितीचे काम  सुरु झाल्याने सुखद अनुभूती जाणवत असेल. राम सर्वांचे आहेत राम सर्वात आहेत. मित्रहो मला विश्वास आहे की श्रीराम यांच्या नावाप्रमाणेच नाम अयोध्येत निर्माण होणारे भव्य राम मंदिर  भारतीय संस्कृतीच्यासमृद्धवारसाचे  द्योतक राहील. मला विश्वास आहे की इथे निर्माण होणारे राम मंदिर  अनंत काळापर्यंत मानवतेला प्रेरणा देईल म्हणूनच आपल्याला हे ही सुनिश्चित कार्याला हवे की भगवान श्री राम यांचा संदेश, राम मंदिराचा संदेश, आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत निरंतर कसा पोहोचेल.आपले ज्ञान आपले जीवन याच्याशी विश्वपरिचित होईल ही आपली आपल्या वर्तमान आणि भावी पिढीची विशेष  जबाबदारी आहे. आज देशात भगवान राम यांचे चरण जिथे जिथे लागले तिथे राम पर्यटन मंडल निर्मिती करण्यात येत आहे. अयोध्या भगवान राम यांची स्व:तची नगरी आहे, अयोध्येचा महिमा प्रभू श्री राम यांनी सांगितला आहे. जन्म भूमी मम पुरी सुहावनी असे राम  म्हणतात. माझी जन्म भूमी अयोध्या अलौकिक शोभा असलेली नगरी आहे.  आज प्रभू राम जन्मभूमीची भव्यता दिव्यता वाढवण्यासाठी अनेक ऐतिहासिक कामे होत आहेत. मित्रहो, आपल्या पुराणात म्हटले  आहे न राम सद्स्यो राजा संपूर्ण पृथ्वीवर श्रीराम यांच्यासारखा नीतिवान  शासक कधी झाला नाही श्री राम यांची शिकवण आहे   कोणिही दुखी होऊ नये, गरीब राहू नये, श्री राम यांचा   सामाजिक संदेश आहे नर नारी सर्व समान रूपाने सुखी व्हावेत भेद भाव नाही, श्री राम यांचा संदेश आहे  शेतकरी पशुपालक सर्व नेहमीच आनंदी राहोत श्री राम यांचा आदेश आहे, वृद्ध,  बालके, चिकित्सकयांची नेहमीच रक्षण झाले पाहिजे कोरोनाने आपल्याला हे शिकवले आहे. जो शरण येईल त्याचे रक्षण करणे सर्वाचे कर्तव्य आहे. श्रीरामजी यांचा हा संदेश आहे, जननी जन्म भूमीश  स्वर्गादपि गरीयसी, आपली  मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही मोठी असते ही श्रीरामांची नीती आहे. ती काय आहे. भय बिनु होय न प्रीती म्हणूनच आपला देश जितका सामर्थ्य शाली राहील तितकीच प्रीती आणि शांती राहील, राम यांची हीच नीती, राम यांची हीच रिती शतकांपासून भारताचे मार्गदर्शन करत राहिली आहे.

रामाचे हेच धोरण, हाच रिवाज वर्षानुवर्षे भारताला मार्गदर्शन करीत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी याच सूत्रानुसार, याच मंत्रानुसार रामराज्याचे स्वप्न बघितले होते. रामाचे जीवन, त्याचे चरित्रच गांघीजींच्या रामराज्याचा मार्ग आहे. मित्रांनो, स्वतः प्रभू श्रीरामांनी सांगितले होते कि “देश, काल, अवसर अनुहाअरी , बोले वचन बिनीत बिचारी” अर्थात राम हे वेळ, स्थळ आणि परिस्थितीनुसार बोलतात, विचार करतात आणि कृती करतात. राम आपल्याला कालपरत्वे पुढे जायला, वेळकाळ पाहून मार्गक्रमण करायला शिकवितात. राम हे परिवर्तनाच्या बाजूने आहेत. राम आधुनिकतेच्या बाजूने आहेत. त्यांच्या याच प्रेरणांसोबत, श्रीरामांच्या आदर्शांसोबत भारत आज वाटचाल करीत आहे.

मित्रांनो, प्रभू श्रीरामांनी आपल्याला कर्तव्याचे पालन करण्याची शिकवण दिली आहे. आपली कर्तव्य कशी पार पाडायची याची शिकवण दिली आहे. त्यांनी आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडून बोध आणि शोधाचा मार्ग दाखवला. आम्हाला परस्परांप्रती स्नेह आणि बंधुभावाप्रती भर देऊन राममंदिराच्या या शिळा रचायच्या आहेत. आम्हाला काळजी घ्यायची आहे जेव्हा जेव्हा लोकांनी रामाप्रति विश्वास ठेवला तेव्हा विकास झाला आहे. जेव्हा जेव्हा आपण भरकटलो तेव्हा विनाशाचे मार्ग खुले झाले. आम्हाला सगळ्यांच्या भावना लक्षात घ्यायला हव्या. आम्हाला सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या विश्वासाच्या आधारावर सर्वांचा विकास करायचा आहे. आपले परिश्रम, आपली संकल्पशक्ती याद्वारे एक आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची आहे.

मित्रांनो, तामिळ रामायणात श्रीराम सांगतात, “ कालं तां इंद ईनुं इरितु पोलां ” याचा अर्थ आता उशीर करायचा नाही; आता आपल्याला पुढे जायचे आहे. आज भारतासाठीसुद्धा, आपल्या सर्वांसाठीसुद्धा भगवान रामाचा हाच संदेश आहे. मला विश्वास आहे कि आपण सर्व पुढे मार्गक्रमण करू, देशाचीही प्रगती होईल. भगवान रामाचे हे मंदिर युगानुयुगे मानवतेला प्रेरणा देईल. मार्गदर्शन करेल. तसे तर कोरोना महामारीमुळे ज्या प्रकारची परिस्थिती आहे प्रभू रामचंद्रांचा मर्यादेचा मार्ग आज अधिक आवश्यक आहे. सध्याच्या काळाची मर्यादा आहे ती दोन फुटाचे अंतर आणि मास्क आहे आवश्यक.

मर्यादांचे पालन करीत सर्व देशवासियांना प्रभू राम, माता जानकी निरोगी ठेवोत सुखी ठेवोत हीच प्रार्थना आहे. सर्व नागरिकांवर माता सीता आणि श्रीराम यांचा आशीर्वाद कायम राहो. याच शुभेच्छांसह सर्व देशबांधवांचे पुन्हा एकदा कोटी, कोटी अभिनंदन. माझ्यासोबत पूर्ण भक्तिभावाने बोला, सियावर रामचंद्र कि जय, सियावर रामचंद्र कि जय, सियावर रामचंद्र कि जय!!

खूप खूप धन्यवाद !

 

Previous articleराम मंदिर: भूमिपूजनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया
Next articleनाशिक हादरले-मनमाडमधील नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 20 =