जुन्नर,दि.30 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे लेण्यांविषयी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लेणी अभ्यासक दुखावले आहेत. त्यांनी आपल्या भावनांना सोशल मीडियावर मोकळी वाट करून देताना या विधानाचा निषेध केला आहे.
देशातील सर्वात जास्त लेणी समूह व लेण्या जुन्नर तालुक्यात आहेत. ऐतिहासिक लेण्यांचा वैभवशाली वारसा जुन्नरला लाभला आहे. देश विदेशातील अनेक लेणी अभ्यासक, संशोधक व पर्यटक वर्षभर येथील लेण्या पाहण्यासाठी तसेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. अनेक लेण्याकडे जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही, तरीदेखील ते तेथे जातात. मात्र, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी “तुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही’ असे वादग्रस्त विधान करत लेणी अभ्यासक, संशोधकांचा अपमान केला असल्याची भावना व्यक्त होत आहे.लेण्याद्री येथील अष्टविनायकाचे दर्शनासाठी विनाशुल्क प्रवेश मिळावा या व अन्य मागणीसाठी स्थानिक नागरिकांचे येथे उपोषण सुरू आहे. शनिवारी (ता.28) उपोषणकर्त्याची भेट प्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ते म्हणाले, “”लेण्याद्रीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्त्व विभाग तिकीट घेत आहे. ते बंद करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहोत. पैसे घेऊन दर्शन घ्यायचे असे भारतात कोठेही नाही. लेणीला जायला वेगळा रस्ता व मंदिराकडे जायला वेगळा रस्ता करावा. जेणेकरून ज्यांना लेणी पहायची ते पैसे देऊन जातील व ज्यांना दर्शनाला जायचं ते फुकट जातील.”
उपोषणामुळे गेल्या काही दिवसांत पर्यटक व पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याने याबाबत त्यांनी येथे फलक लावून त्यांची भूमिका मांडली आहे.