सातारा,दि. २६ सप्टेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असून ग्रामीण भागात आरोग्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.वडूज येथील जम्बो (पोर्टेबल) कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर देशमुख, सुनील माने, अमेरिका इंडिया फाउंडेशनचे मॅथ्यू जोसेफ, डॉक्टर फॉर यु संस्थेचे साकेत झा आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाने 500 रुग्णवाहिका घेतल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत आणखी 500 रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणाला प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वांनी मास्कचा वापर केल्यास आणि एकमेकांची काळजी घेतल्यास कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होईल.मॉड्युलर कोविड रुग्णालयामुळे उपचाराची चांगली सोय होणार असून अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इथे उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. डॉक्टर फॉर यु संस्थेचे डॉक्टर्सदेखील उपचारासाठी सहकार्य करणार आहेत. रुग्णांचा ताण कमी करून त्यांना प्रसन्न वाटावे असे वातावरण उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी आणि परिसरात स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वडूजच्या वाढीव पाणी पुरावठा योजनेस मंजुरी देणार वडूज नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वडूज वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यात येईल, त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या आठवड्यात प्रस्ताव सादर करावा, असे श्री. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, नगर पंचायतीने दर्जेदार कामे करावी. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून आराखड्यास अंतिम रूप देऊन लवकरच काम सुरू करण्यात येईल. जिहे कटापूर योजनेचे कामदेखील लवकर सुरू करण्यात येईल असे श्री. पवार म्हणाले.
सातारा ही देशभक्तांची आणि वीरांची भूमी असून इथल्या नव्या पिढीने हा वारसा पुढे नेताना कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातही यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.श्री.देशमुख म्हणाले, नव्या कोविड रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. या रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष सहकार्य मिळाले.अमेरिका इंडिया फाउंडेशनचे मॅथ्यू जोसेफ यांनी जिल्हा प्रशासनाने चांगले रुग्णालय उभारल्याचे सांगितले. कोविड काळात आरोग्याच्या उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी आणि मृत्यू दर कमी होत आहे. 608 ऑक्सिजन, 80 व्हेंटिलेटर आणि 184 आयसीयू बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे. 6 नवीन मिनी जम्बो कोविड रुग्णालय, 20 पीएसए ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 175 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन क्षमता वाढविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर फॉर यु संस्थेतर्फे देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या किल्ल्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
तत्पूर्वी श्री. पवार यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.ग्रामीण रुग्णालय वडूज परिसरात अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यातून 100 बेडेड मॉड्युलर कोविडं हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून 250 एलपीएम ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हॉस्पिटलमध्ये 8 कंटेनर असून 64 ऑक्सिजन आणि 16 आयसीयू बेड आहेत. 10 व्हेंटिलेटर आणि 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सयंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरणे, औषधे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.