सोलापूर,दि. २६ सप्टेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सोलापूर जिल्ह्यातील महानेट, प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राज्य एस टी महामंडळ इत्यादी विभागांच्या कामांचा आढावा गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे घेतला.यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता ए.बी.खेडकर, उपअभियंता एम.एम अटकळे, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, श्रीमती अर्चना गायकवाड, एस.टीचे विभाग नियंत्रक विलास राठोड, एस.टी. यंत्र अभियंता विवेक लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर, विभागीय अभियंता विरसंग स्वामी आदी उपस्थित होते.श्री. पाटील यांनी महानेट योजनेंतर्गत चालू असलेल्या सद्यस्थितीच्या कामाची सविस्तर माहिती घेतली. काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.जिल्ह्यामध्ये म्हाडा व प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुरू असलेल्या गृह प्रकल्पाच्या कामाची माहिती घेतली. काम दर्जेदार होण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.शासनाकडून लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांना देण्यात येणारी मदत जिल्ह्यातील पात्र रिक्षाचालकांना मिळावी. या मदतीपासून एकही पात्र रिक्षाचालक वंचित राहू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शाळा, कॉलेज लवकरच सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले की, एस.टी विभागाने योग्य प्रकारे नियोजन करून प्रत्येक मार्गावर एस.टी सेवा सुरू करावी जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही. तसेच एस.टी विभागाने सुरू केलेली माल वाहतूक सेवाही चांगली आहे. त्यामधून सोलापूर एस.टी विभागाला चांगला फायदा झाला आहे. एस.टी.च्या आगार प्रमुखांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने माल वाहतूक मिळते का तेही पहावे असेही, पाटील यावेळी म्हणालें.