पिंपरी,दि.18 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बेकायदेशीर दारु विक्री करणा-यांचे समर्थन करण्याची वेळ शिवसेना नेत्यांवर का आली आहे ? अशा बेकायदेशीर कामाचे समर्थन करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टिका मानिनी फाऊंडेशच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली.गुहागर येथिल शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर बेकायदेशीर दारु विक्री केल्याबद्दल पोलीसांनी नुकतीच कारवाई केली. अशा कर्तव्यतत्पर पोलीसांना पाठबळ देण्याऐवजी ‘पोटा पाण्यासाठी दारु विकली तर काय झाले ?’ असे जाहिर वक्तव्य शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केले आणि पोलीसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले. बेकायदेशीर कामाला पाठीशी घालणा-या भास्कर जाधव यांचा मानिनी फाऊंडेशनच्या वतीने आम्ही सर्व महिला तीव्र निषेध करीत आहोत असे पत्रक मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पुर्ण होत आहे. शिवसेना पक्ष महाविकास आघाडी सरकार मधील मुख्यपक्ष आहे. उद्योग खात्यासह मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आहे. असे असतानाही एका शिवसेना कार्यकर्त्याला पोटा पाण्यासाठी दारु विकावी लागते. हि शोकांतिका आहे आणि उद्योग खात्याचे म्हणजेच या सरकारचे अपयश आहे. लॉकडाऊन नंतर महसूल वाढीसाठी दारु विक्रीला प्रोत्साहन देणारे हे सरकार राज्यातील महिला भगिनींच्या विरोधात जाऊन गोरगरीबांचे संसार उध्वस्त करीत आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास या सरकारला अपयश आले आहे. गोर गरीबांसाठी ज्याप्रमाणे ‘शिव भोजन थाळी’ सुरु केली आहे. त्याप्रमाणे आता शिवसेना कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने त्यांना दारु विक्रीची दुकाने सुरु करुन द्यावीत, अशीही उपरोधिक टिका डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे.