नवी दिल्ली,दि. 21 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-2020च्या ऑगस्ट अखेरीपासून कांद्याच्या किरकोळ किमतीत वाढ दिसून आली आहे. गेल्या दहा दिवसात कांद्याच्या भावात किलोमागे 11.56 रुपयांची वाढ झाल्याने देश पातळीवर कांद्याची किरकोळ किंमत 51.95 रुपये प्रती किलो झाली आहे. ही किंमत गेल्या वर्षीच्या 46.33 रुपये प्रती किलोच्या तुलनेत 12.13% जास्त आहे.
खरिपाचा कांदा बाजारात येण्यापूर्वीच्या काळात देशातल्या ग्राहकांना वाजवी दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने 14.09.2020 ला तत्परतेने पावले उचलत कांदा निर्यातीवर बंदी जाहीर केली. किरकोळ किंमत काही प्रमाणात आटोक्यात आली मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांच्या कांदा उत्पादक जिल्ह्यात नुकताच झालेला मुसळधार पाऊस खरिपाच्या उभ्या पिकाला, साठवलेल्या कांद्याच्या नुकसानाला कारणीभूत झाल्याने हवामानाच्या आघाडीवरच्या या घडामोडींमुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
सरकारने रब्बी कांदा 2020 मधून बफर साठा केला आहे. कांद्याच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी या साठ्यातून सप्टेंबर 2020 च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून टप्याटप्याने कांदा महत्वाच्या बाजारपेठा, सफल, केंद्रीय भांडार यासारख्या किरकोळ पुरवठादाराना आणि राज्य सरकारांना पुरवण्यात येत आहे. येत्या काळात आणखी कांदा जारी करण्यात येईल.
कांदा आयात सुलभ करण्यासाठी सरकारने 21.10.2020 ला फ्युमिगेशन अटी शिथील केल्या. कांद्याची आयात वाढवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांनी संबंधित देशातल्या व्यापाऱ्यांशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्युमिगेशनशिवाय आयात करण्यात आलेल्या या कांद्याचे भारतात फ्युमिगेशन करण्यात येईल.
सुमारे 37 लाख मेट्रिक टन खरीपाचा कांदा बाजारात यायला सुरवात होण्याची शक्यता असून त्यामुळे वाढत्या किमतीला आळा बसेल.