पुणे,दि.14 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मागील वर्षीपासून पुणेकरांनी पावसाचा धसकाच घेतला आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटात सोमवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे पुणेकरांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. रस्त्यांचे नाल्यात रूपांतर झाले. सोसट्यांच्या पार्किंगमध्ये शिरलेल्या पाण्याने अक्षरश: 25 सप्टेंबर व 11 ऑक्टोबर 2019 च्या ढगफुटीची आठवण झाली. मंगळवारी दुपारीही शहरात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली, तर सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
25 सप्टेबर आणि 11 ऑक्टोबर 2019 रोजी ढगफुटीसारखा पाऊस पडला होता. सुमारे मध्यरात्रीपर्यंत पडलेल्या पावसात नऊ जणांना जीव गमवावा लागला होता. हजारो वाहनांचे नुकसान झाले होते. घरांच्या भिंती कोसळल्या होत्या. दोन ते तीन दिवस सहकारनगर, पद्मावती भागातील पार्किंग पाण्याखाली होत्या. आठवडाभर वाहने चिखलात रूतून होती. या सर्व गोष्टींची सोमवारच्या पावसाने आठवण करून दिली. या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. ओंढे भरून वाहत होते, तर रात्री उशीरापर्यंत अनेक चौकांत पाणी साचलेले होते. वीजांच्या कडकडाटाने पुणेकरांच्या भितीत भरच घातली.
काल दुपारी पुन्हा जोरदार पाऊस पडला. सुमारे आर्धा तास ते पाऊन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्ते रिकामे झाले, तर तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, भोहरी आळी, सराफी बाजार, लक्ष्मी रस्त्यावरील कापड बाजारातील व्यवहार काही काळासाठी ठप्प झाले. पाऊस थांबल्यानंतर मात्र बाजारपेठेतील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. तसेच ढगाळ वातावरण कायम असल्याने पावसाच्या भितीने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. पावसामुळे अनेक चौकांतील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर काही चौकांत पाणी कायम असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.
शहरात आज मुसळधार
मागील काही दिवसांपासून शहरात सातत्याने जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (बुधवारी) शहर आणि परिसरात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. जिल्ह्यातील घाट विभागात मात्र अतिवृष्टी होणार आहे. येत्या 19 ऑक्टोबर पर्यंत शहरात रोजच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मागील 24 तासात शहरात 16.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.
सातारा, सांगली, कोल्हापूरात रेड अलर्टआंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी तीव्रतेच्या वादळाचा प्रभाव म्हणून आज पुणे परिसर आणि विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगलीसह सिंधुदुर्ग, रायगड, धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उस्मानाबाद, रत्नागिरी, सोलापूर, परभणी, बीड या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबई परिसरात पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. जिल्हाधिकार्यांनीही नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.