Home ताज्या बातम्या महात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य : राज्यपाल भगतसिंह...

महात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

58
0

मुंबई, ,दि.03 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सेवाग्राम येथे वास्तव्य असताना महात्मा गांधींनी आत्मनिर्भर भारताची आधारशीला मांडली. गांधीजींच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे व तीच त्यांना सच्ची आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाने गांधीजींच्या १५१ व्या जयंती वर्ष समारोपानिमित्त ‘दीपोत्सव’ तसेच ई- पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते, त्यावेळी राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, विद्यापीठाचे कुलपती कमलेश दत्त त्रिपाठी, कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल आदि उपस्थित होते.

विविध धर्म व भारतीय संस्कृतीबद्दल सार्थ अभिमान जागविणारी, मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व देणारी गांधीजींच्या संकल्पनेतील नई तालीम आज नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रतीत होत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

गांधीजींची अहिंसा ही बलवान व समर्थ व्यक्तीची अहिंसा होती असे सांगून आज आक्रमक चीनला भारत त्याच निर्भीडतेने तोंड देत आहे, असे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या जन्माला १५१ वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या बलिदानाला सात दशके पूर्ण झाली. मात्र जसजसा काळ पुढे जात आहे, तसतसे गांधीजींचे विचार आणि तत्वज्ञान अधिक कालसुसंगत व प्रासंगिक होत आहे, असे सांगून गांधीजी आज धर्म, भाषा, प्रांत व भौगोलिक सीमांपलीकडे सर्व जगाकरिता ‘आयकन’ झाले आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

अलिकडेच आपण सेवाग्रामला भेट दिली होती. गांधीजी व विनोबा भावे यांचे वास्तव्य असताना हा परिसर जसा असेल तसाच तो आजही आहे असे सांगून वर्धा जिल्हा हे तीर्थस्थळ व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्थानिक वस्तूंचा आग्रह, ग्रामीण कुटीर उद्योगाला चालना या माध्यमातून त्यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करता येईल, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कलराज मिश्र यांच्या हस्ते महात्मा गांधींनी लिहिलेल्या मंगल प्रभात या पुस्तकाच्या संस्कृत भाषांतरित ई- आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. सुरूवातीला कलराज मिश्र यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना व मूलभूत कर्तव्य यांचे वाचन केले.

Previous articleस्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
Next articleकोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल; ३९ हजार ००४ जणांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + seventeen =