मुंबई,दि.7जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्यातील विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे तीस मिनिटे झालेल्या या भेटीत या दोन नेत्यांमध्ये राज्याच्या विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा झाली.
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात बैठक झाली होती. त्यानंतर दोन दिवसात पुन्हा ही बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात हॉटेल व्यवसायाबरोबरच इतर उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शेतकर्यांना विकल्या जाणार्या बोगस बियाणांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.