कामगारांना मिळणार बहुउद्देशीय कलाकेंद्रासाठी एकत्रित भूखंड
पिंपरी,4 जून 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-नेहरूनगर पिंपरी येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून 1992 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे करारनामा करून हस्तांतरीत केला होता. या प्रकल्प हस्तांतरणाच्या बदल्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी मनपा सेवेत समाविष्ट करावे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास रक्कम रुपये एक कोटी आणि 2,25,000 चौ. फूटाचे भूखंड मनपाने द्यावेत असा करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्याची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेल्या 25 वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत होते. त्यामुळे 1 जून 2020 रोजी मनपा सर्वसाधारण सभेत कामगार कल्याण मंडळाची ही मागणी मंजूर करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व केंद्रीय कामगार मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
1 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. 5 महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 79 मधील तरतूदीनुसार 30 वर्ष कालावधीसाठी पिंपरी स.नं. 150 पैकी, 151 पैकी, आरक्षण क्र. 95 अजमेरा क्षेत्र 22 हजार 500 चौ. मी.; क्षेत्र 2 लाख 42 हजार 100 चौ. फूट (प्रयोजन बहुउद्देशीय कलाकेंद्र) उपरोक्त जागेपैकी 2 लाख 5 हजार चौ. फूट जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली होती. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कामगार कल्याण मंडळाची ही न्याय्य मागणी मान्य व्हावी यासाठी कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे सहकार्य लाभले. यापूर्वी कामगार कल्याण मंडळाने महानगरपालिकेचे महापौर माई ढोरे, तत्कालीन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, भूमी जिंदगी अधिकारी सहाय्यक आयुक्त चितळे, कामगार नेते नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात, नामदेव ढाके आणि सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले, महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाचे निरीक्षक संजय सुर्वे यांच्यासमवेत भारती चव्हाण यांच्यासह गुणवंत कामगार प्रतिनिधी शिवाजीराव शिर्के, राज अहिरराव, तानाजी एकोंडे, मोहन गायकवाड, भरत शिंदे, राजेश हजारे, गोरखनाथ वाघमारे, रामकृष्ण राणे, सुभाष चव्हाण, संजय गोळे, अण्णा जोगदंड, कल्पना भाईंगडे, पंकज पाटील, बबन झिंजूर्डे, काळूराम लांडगे आदींच्या अनेक बैठका झाल्या. त्यामधून निघालेल्या निष्कर्षातून कामगार कल्याण मंडळास एकाच ठिकाणी जागा देणे सोयीचे असल्याने पिंपरी अजमेरा येथील भूखंड देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले.
कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकी हक्काची आहे. ही जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला मिळावी, यासाठी गेल्या 27 वर्षापासून कामगार कल्याण मंडळ प्रयत्न करीत आहे. दरम्यानच्या काळात या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा व बैठका मनपा प्रशासनाबरोबर झाल्या. या बैठका सुरु असताना कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचा हक्क डावलून मनपा प्रशासनाने बेकायदेशीररित्या कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली होती. याला कामगार कल्याण मंडळाने विरोध दर्शविला होता. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमचे पीपीपी तत्वावर पुर्नविकास करणे हे देखील बेकायदेशीर आहे याबाबत न्यायालयीन लढा सुरु करण्याचा इशारा दिला होता. कष्टकरी कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेल्या या नगरीत कामगारांचेच हक्क प्रशासन डावलत असल्याबाबत आवाज उठवण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमधून सर्वात जास्त कामगार निधी मंडळाकडे जमा होतो. या निधीमधूनच मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे भव्य कामगार प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी प्रशिक्षण केंद्र, सभागृह, वसतिगृह, अभ्यासिका, जलतरण तलाव, ग्रंथालय, मनोरंजन केंद्र, नाटयगृह अशा प्रकारच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. पिंपरी चिंचवड मनपाच्या आडमुठया धोरणामुळे पिंपरी चिंचवड सारख्या कामगारनगरीतच कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्यावर अन्याय होत होता. हा विषय मार्गी लागावा यासाठी 1993 पासून मा. कामगार मंत्री एकनाथराव गायकवाड, 2002ला मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष कामगार मंत्री मा. डॉ. हेमंतराव देशमुख, 2005 मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांनी याबाबत लक्ष घालावे. यासाठी भारती चव्हाण, अरुण बोऱ्हाडे, शंकरराव गावडे, पी.बी. प्रभु, के.एस. काळभोर, व्ही. बी. पावसकर, बी. बी. इंगवले, आर. के. सोंडकर, किशोर ढोकळे, शिवाजी शेडगे, यशवंत भोसले, शेखर सावंत, सुभाष सरिन, विनायक घोरपडे, अरुण गराडे, बाळासाहेब तेलंगी, नामदेवराव गोलांडे, अरविंद प्रभुणे, दिनेश परपुळकर, बहिरट, एन. एन. जगदाळे, पी. एन. बारहाते, ए. आर. पाटील, हरिभाऊ चिंचवडे, आनंद ठकार आदी प्रमुख कामगार नेत्यांनी पवार साहेबांना विनंती केली होती. स्टेडीयमच्या जागेसंदर्भातील शेवटची बेठक सप्टेंबर 2019 मध्ये सहाय्यक आयुक्त पवार, अतिरिक्त आयुक्त चितळे आणि भारती चव्हाण व कल्याण उपआयुक्त समाधान भोसले यांचे दरम्यान झाली होती.