मावळ, दि.१३ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘लॉकडाउन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाला. हजारो कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून मावळातील २० हजार गरजु कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याचा उपक्रम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हाती घेतला आहे.
तालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र परिवार यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे सोमवार (दि.१३एप्रिल २०२०) येथे सकाळी ११ वाजता या उपक्रमाची औपचारिक सुरूवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १४ हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तसेच सामाजिक संस्था, सभासद यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, कोरोना विषाणुविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना आम्ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून ह्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करुनच जीवनावश्यक वस्तू वाटप’
वाटप करताना प्रशासनाने दिलेल्या ‘सोशल डिस्टंसिंगबाबत सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. गरजु कुटुंबियांना एक महिना पुरेल इतका किराणासह अत्यावश्यक ११ वस्तुंचा संच तयार केला आहे. ग्रामीण भागातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ येथील गरजु कुटुंबांसह १९ आदिवासी गावे, डोंगर पठारावर असणारे पाडे, वाड्या वस्त्यांवर जावून घरपोच धान्यवाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी शासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घेतली जाईल, असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.