Home ताज्या बातम्या पुढील ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद; महाराष्ट्राला मोठा वाटा...

पुढील ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद; महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

55
0

मुंबई,दि.७सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
मुंबई मेट्रोच्या तीन मार्गिका, मेट्रो भवनचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन; मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण
मुंबई २१ व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (Mobility), संपर्क (Connectivity), उत्पादकता (Productivity), शाश्वतता (Sustainability) आणि सुरक्षा (Safety) याला प्राधान्य देत आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या ५ वर्षात देशात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातील मोठा वाटा महाराष्ट्राला मिळेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
बांद्रा कुर्ला संकुलातील कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रो मार्ग १०, ११ आणि १२ या तीन मेट्रो मार्गिकांचे तसेच मेट्रो भवनचे भूमिपूजन, मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण, बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले. यावेळी महामुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, विपरीत परिस्थितीत यश कसे मिळवायचे हे आपण सर्वांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकले पाहिजे. खरे तर कोणतेही लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करणारे तीन प्रकारचे लोक असतात. पहिले जे काम सुरूच करत नाहीत. दुसरे काम सुरू करतात पण अडचण आल्यावर काम सोडून पळतात तर तिसऱ्या प्रकारचे लोक लक्ष्य गाठण्यासाठी निरंतर प्रयत्न करतात. इस्त्रोचे शास्त्रज्ञ हे तिसऱ्या प्रकारात येत असल्याने मला विश्वास आहे की चंद्रावर पोहचण्याचे आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
श्री. मोदी म्हणाले, भारतात जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी पहिली मेट्रो सुरु झाली. त्यानंतर २०१४ नंतर आज देशभरात २७ शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. यामध्ये जवळपास ६७५ किमी अंतर या मेट्रोमध्ये येणार असून ४०० किमी प्रवासाचा टप्पा गेल्या ५ वर्षात सुरु झाला आहे. २१ व्या शतकात एक भारत – श्रेष्ठ भारत असे आपण म्हणतो, त्यावेळी दळणवळणासाठी एक राष्ट्र एक संपर्क यंत्रणा’ तयार होणे आवश्यक आहे. मुंबईमुळे देशालासुद्धा गती मिळते. मुंबईत पायाभूत सुविधांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे होत आहेत. या सगळ्या योजनांमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येईल.
मुंबईत होत असलेल्या मेट्रोमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येणारच आहे, त्याशिवाय या सेवेमुळे जवळपास १० हजार इंजिनिअर्स आणि ४० हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे जवळपास ५० हजार रोजगार यामुळे मिळणार आहे. मुंबईत होत असलेल्या नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे जलद वाहतूक सेवा आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.
आपल्या भाषणातही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी उपस्थिताना गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या परंपरेची गाथा देशविदेशातही गौरविली जात आहे. मुंबई व महाराष्ट्रातील लोकांची साथ मला नेहमीच प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रदूषणमुक्तीचा संकल्प करा
सध्या गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा होत आहे. पण यानिमित्ताने आपण सर्वांनी ‘एक देश, एक संकल्प’ करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. गणपती विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात कचरा समुद्रात टाकला जातो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यावेळी आपण सर्वांनी संकल्प करुया की, प्लॅास्टिक, कचरा समुद्रात आणि मिठी नदीत टाकणार नाही.
इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल – मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मेट्रो सेवेचे जाळे विणले जात असल्याने येत्या काही वर्षांत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा बदल झालेला दिसणार आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या मेट्रो १०, मेट्रो ११ आणि मेट्रो १२ यामुळे मुंबई आणि उपनगरातील कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. आज देशातील मेट्रोचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात होत असून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. फडणवीस म्हणाले, आज भूमीपूजन केलेल्या मेट्रो मार्गांमुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पासून थेट ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबईपर्यंत जाता येणार आहे. या ३ लाईनमध्ये पुढील १० वर्षात ४० लाख प्रवासी दररोज प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक यंत्रणांचे इंटिग्रेटेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ३२० किमीच्या या मेट्रो मार्गामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही मिनिटेच लागणार आहेत. सन २०२१-२२ पर्यंत २१२ किमी आणि २०२३-२४ पर्यंत आणखी ८५ किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. यामुळे जवळपास २.५ कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.
आज भूमिपूजन करण्यात आलेल्या मेट्रो भवनमध्ये सर्व मेट्रो सेवांचे संचलन होणार असून आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे मेट्रो चालविण्यात येणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात मेट्रो कोच निर्मितीचे कंत्राट ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बीईएमएल या भारतीय कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर, मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असून हायब्रीड मेट्रोच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या रस्त्यांवर मेट्रो वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिक येथे हायब्रीड मेट्रो सुरू करण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने यावेळी आभार व्यक्त केले. तसेच चांद्रयान-२ मोहिमेत भारताच्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल म्हणाले, मुंबई हे आपल्या सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे शहर आहे. मुंबई शहराचा काळाशी सुसंगत असा विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या योजनांचे भूमिपूजन करुन या योजना प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येईल. मेट्रो सेवेमुळे मुंबईकरांना सुरक्षित, सुखकर आणि जलद प्रवास करणे शक्य होणार आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे हे कलम ३७० प्रत्यक्षात आणल्यामुळे सिध्द झाले आहे. आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभूतपूर्व संशोधनामुळे चांद्रमोहिम यशस्वी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या देशामध्ये ताकद, क्षमता आणि कुवत आहेच, पण योग्य दिशा दाखविणारे समर्थ नेतृत्व भारताला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाले आहे. मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी येणारी मेट्रो भविष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कोचचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी, राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मेट्रो कोचची पाहणी केली. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाबद्दल अधिक माहिती दिली.
कार्यक्रमास व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच मंत्रीमंडळातील सदस्य राज्यमंत्री विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार राजन विचारे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

Previous articleलक्ष्मण मानेची प्रकाश आंबेडकरांवर टिकास्ञ संघटक माणसे जोडतो,तोडत नाही
Next articleबचत गटांच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार: प्रधानमंञी मोदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + seventeen =