मुंबई,दि.७ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठपली असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अनोखा प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आंबेडकरांच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचे पूर्वीचे सहकारी लक्ष्मण माने यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
परंतु, आंबेडकरांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेल्या एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य केले.
बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून लोक प्रकाश आंबेडकरांकडे सद्भावनेने पाहतात. परंतु, ते लोकांची सद्भावना समजून घेत नाहीत. लोकशाहीत संघटकाचे काम माणसं जोडून संघटन मजबूत करण्याचे असते. माणस तोडून राजकारण शक्य नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांकडून माणसं तोडली जातात. ते सहकाऱ्यांसोबत विश्वासाने राहात नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकरांचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.