मुखेड,दि.04 सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लग्नाची तिथी ठरवण्यासाठी पाहुणे एकत्र आले आणि एकमत होऊन लागलीच विवाह ठेवायचा असा निश्चय केला आणि लग्न ठरवायला आलेले पाहुणे लग्नच लावून वधूला घेऊन गेले.
मुखेड येथे घडलेला हा प्रकार समाजापुढे आदर्श उभा करणारा असून उधळपट्टीला लगाम लावणारा आहे. राहुरी येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्रमुख असलेले भास्कर आल्लाट यांचे चिरंजीव मिलिंद आणि मुखेड येथील प्रभाकर दामू साळवे यांची मुलगी सोनल यांचा विवाह उरकण्यासाठी पाहुणेमंडळी मुखेड येथे आली होती. मुला-मुलींना पसंतीचा कार्यक्रम उरकल्यानंतर दोन्ही कुटुंबे विवाहासाठी तयार झाली, कुंकू लावण्याचेही ठरवले, पण खर्चात पडून विनाकारण बडेजाव मिरवत आर्थिक नुकसान करण्यापेक्षा दोन्ही बाजूने मनाचा मोठेपणा दाखवत लगेच विवाह उरकून घेऊ असा प्रस्ताव पुढे आला.
आल्हाट व साळवे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईकदेखील तयार झाले आणि चालता-बोलता हा विवाह मुखेड येथे उरकला. कोणताही खर्च न करता अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून हा विवाह उरकून सुनेला घेऊन आल्हाट कुटुंबीय राहुरीला परतले. या दोन्ही कुटुंबीयांच्या या मोठेपणाचे स्वागत होत असून इतरांनीही अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साखरपुडय़ात लग्न उरकण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे, सुदाम आहेर, राजेंद्र खैरनार, कारभारी खैरनार,मामा दत्तू साळवे, माणिक साळवे आदींनी पुढाकार घेतला.




