Home ताज्या बातम्या विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक...

विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

53
0

नांदेड,दि.20 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन शासनाने हाती घेतलेल्या विविध लोकाभिमुख योजनांच्या कामांना गती देण्यासाठी प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड येथे ही दोन स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता ही दोन्ही कार्यालये नांदेड येथे सुरू झाल्याने 4 जिल्हे औरंगाबाद विभागात तर इतर 4 जिल्हे नांदेड विभागात सुरू झाल्याने संकल्पचित्र व गुणवत्ता नियंत्रण कामांना गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नांदेड येथे स्नेहनगर भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकुलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षता व गुणनियंत्रण आणि संकल्पचित्र (पूल व इमारती) विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीरडे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, इतर वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यालयांच्या निर्मितीबरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वातावरणात काम करता आले पाहिजे. जेवढे अधिक चांगले वातावरण अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळेल तेवढ्या चांगल्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी आपले काम गुणवत्तेने पूर्ण करतील यावर माझा विश्वास आहे. काम करतांना झालेल्या चुका एकवेळेस समजून घेता येईल. कामात जर कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याबाबतही वेगळा विचार करावा लागेल, असे स्पष्ट करुन चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रस्ते, पूल, इमारती सारख्या विकास कामांमध्ये आरेखनापासून त्याच्या नियोजनापर्यंत लागणारा कालावधी हा कमी करायचा जर असेल तर हे कार्यालय आणि कार्यालयातील मनुष्यबळ वाढविण्याशिवाय पर्याय नाही. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांपासून शासनाच्या विविध प्रकल्पातील योजनांच्या कामाचा व्याप केवळ औरंगाबाद येथे एकच कार्यालय असल्याने त्यावर पडत होता. आता हा व्याप विभागाला जाऊन विकास कामांच्या आरेखन, संकल्पचित्राचे काम नांदेड येथे सुरू झाल्यामुळे या होणारा विलंब टाळता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विकास कामांमधील गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा व जबाबदारीचा विषय असून त्यासाठी आवश्यक असणारा दक्षता व गुणनियंत्रण विभागही आता नांदेडमध्ये कार्यान्वित झाला आहे. विकास कामांसाठी उपलब्ध होणारा निधी किती आव्हानातून शासनाला पुरवावा लागतो याची जाणीव कंत्राटदारांनी ठेऊन कोणत्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करता कामा नये. मागील काळात मिळालेल्या कंत्राटाची इतर कंत्राटदारांना विक्री अशी फसवाफसवीची वृत्ती झाल्याने याचा कामाच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झाला. तसे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सांगून त्यांनी ज्या कंत्राटदारांनी गुणवत्तापूर्ण काम केलेले आहे त्यांचे पैसे अडकवू देणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. विकास कामांना लागणाऱ्या निधीची अडचण जरी असली तरी प्राधान्य क्रमाने जी कामे ठरविली आहेत, जी कामे अधिक लोकाभिमूख आहेत अशा कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे. शासकीय पातळीवरुन अशा गुणवत्ताधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याकरीता महसूल दिनाच्या धर्तीवर अभियंता दिनही पुढच्यावर्षीपासून आपण साजरा करु असे ते म्हणाले. यावेळी मुख्य अभियंता दिलीप उकिरडे व अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे  यांनी आपल्या मनोगतात या नवीन कार्यालयाची रचना व महत्त्व विशद केले. कार्यक्रमास नवीन कार्यालयातील अभियंतासह इतर विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

Previous article“तृतीयपंथीचा फॅशन शो” ‘अर्धनारी नटेश्वर’ आणि ‘मिस अ‍ॅण्ड मिसेस व्हिजन महाराष्ट्र प्रेजेंट’ कार्यक्रमाचे पुण्यात 23 सप्टेंबरला आयोजन
Next articleMIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला ; हिंदू सेनेच्या ५ जणांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × one =