निगडी, दि. १४ सप्टेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवडच्या सेक्टर २२, यमुनानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये राहणा-या सोनाली हरीभाऊ उबाळे हिला केंद्र शासनाकडून नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप टू शेड्यूल कास्ट या योजनेअंतर्गत नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका येथे मास्टर्स ऑफ सायन्स इन गेम सायन्स अँड डिझाईन या दोन वर्षाच्या शिक्षणासाठी येणा-या १ कोटी २० लाख खर्चाकरीता शिष्यवृत्ती नुकतीच जाहीर झाली आहे.सोनाली उबाळे ही पिंपरी चिंचवड शहराचा तसेच राज्य आणि देशाचा नावलौकिक अमेरीकेसारख्या देशात वाढविण्यासाठी निश्चितच अभिमानास्पद कामगिरी करेल असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सोनालीचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, सोनालीचे वडील हरीभाऊ उबाळे आई रंजना उबाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रबुध्द कांबळे, अभिजित गिरी, दिग्विजय सवाई, सुलतान तांबोळी आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील खेळाडू, विद्यार्थी, नागरीक मोठ्या प्रमाणात दैदिप्यमान कामगिरी करीत आहेत त्यामुळे शहराच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होत असून ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगून त्यांनी सोनाली उबाळे हीचे पालक, शिक्षक आणि त्या भागातील लोकप्रतिनिधींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सोनाली उबाळे पुढील आठवड्यात शिक्षणासाठी अमेरीकेस रवाना होणार आहे अशी माहिती तिच्या पालकांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.