Home ताज्या बातम्या कोरोना नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोरोना नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई,दि.22 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-: राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची  गरज असल्याचे मत महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. निर्बंध असूनही राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.बैठकीस आरोग्यमंत्री  श्री. राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख, पोलीस महासंचालक श्री. संजय पाण्डेय, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय, आयुक्त श्री. रामास्वामी एन,  जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.रुग्णवाढ रोखण्यात अपयश आल्यास पुढील काळात त्याचा फटका सर्वसामान्य तसेच आरोग्य, प्रशासन यंत्रणांना बसू शकतो. परिस्थितीनुसार अधिकाधिक टेस्ट, ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा, गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. टेस्टची संख्या कमी केल्याने अनेकदा रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसते प्रत्यक्षात तसे करणे धोकादायक ठरते. गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याच्या सूचना श्री. थोरात यांनी केल्या.वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख म्हणाले, रुग्ण उशीरा रुग्णालयांत दाखल होत असल्याने रुग्णवाढ व मृत्यूदर वाढत असल्याचे आढळून येते. काळी व पांढरी बुरशीचा आजार फैलावत असून त्याची औषधे रुग्णांना वेळेवर मिळणे गरजेचे आहे. ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हे स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. नव्याने आलेल्या सेल्फ टेस्ट किटचा उपयोग कसा करता येईल यावरही तज्ज्ञांनी विचार करावा. टास्क फोर्सच्या बैठका दर आठवड्याला व्हाव्यात. लसीकरण वेगाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे राज्यात तिसरी लाट कधी येऊ शकते याचा नेमका अंदाज टास्क फोर्सने दिल्यास जिल्हा प्रशासनास तयारी करण्यास वेळ मिळेल. त्यानुसार आढावा घेऊन  लाटेस रोखता येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री  श्री. राजेश टोपे म्हणाले, म्यूकरमायकोसीस (काळी बुरशी) हा आजार राज्यात नोटीफाईड डिसीज ठरणार आहे. कोरोना टेस्टिंग हाय आणि लो रिस्कमध्येच वाढवली पाहिजे. टेस्टिंग कुठे केल्या जातात हेही महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यामुळे उपचार लवकर मिळून मृत्यूदर कमी होण्यास मदत होते. ग्रामीण आणि तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची गरज असून. शासन आगामी काळात त्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्याने आजपर्यंत कधीही कोरोनाची आकडेवारी लपवलेली नाही त्यामुळे राज्याने देशात उत्तम काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडियाट्रीक टास्कफोर्सच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.  आजपर्यंतच्या या कामाचे श्रेय प्रशासनास जाते.  लस जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण सुरुच राहणार आहे. खासगी रुग्णालयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडिटर नेमण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत. गृह विलगीकरणाचे प्रमाण कमी करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डॅशबोर्ड अद्ययावत ठेवावा.असेही श्री. टोपे यांनी सांगितले.रुग्णसंख्या नेमक्या कोणत्या भागात वाढते याचे विश्लेषण करावे, रुग्णवाढीची कारणे समजावून घेऊन त्यानुसार उपाययोजना कराव्या, लग्न समारंभासारख्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष द्यावे.घरगुती विलगीकरणातील लोकांमुळे अधिकाधिक रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत असल्याने त्यावर तातडीने, उपाययोजना करण्याची गरज आहे तसेच ते नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही याचे मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. शेजारील जिल्हे, राज्यातून येणाऱ्या स्थलांतरित लोकसमूहाचे नियमित सर्वेक्षण करावे, खासगी रुग्णालयांनी रुग्णांचे शोषण करु नये यासाठी योग्य ती पावले उचालावीत. ज्या कुटुंबातील कमावते लोक कोविडमुळे मृत्युमुखी पडले आहेत अशा कुटुंबाना मदतीसाठी धोरण ठरवावे. विविध शासकीय योजना सीएसआर योजनांचा फायदा अशा कुटुंबांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

Previous articleदौंड- तहसीलदारां मार्फत राज्यपाल व मुख्यमंञ्यांना कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने जनआक्रोश आंदोलनाचे निवेदन
Next article….तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देणे अशक्य होईल – उमेश चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 2 =