Home ताज्या बातम्या कुठल्याही रुग्णासाठी सेवा नाकारता येणार नाही-केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कुठल्याही रुग्णासाठी सेवा नाकारता येणार नाही-केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

74
1

नवी दिल्‍ली, दि.8 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड रूग्णांना कोविड उपचार सुविधांच्या विविध श्रेणींमध्ये प्रवेश देण्याच्या राष्ट्रीय धोरणात सुधारणा केली आहे. याबाबत राज्यांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. या  रुग्ण-केंद्रित उपायांचा उद्देश कोविड 19 च्या  रूग्णांवर त्वरित, प्रभावी आणि व्यापक उपचारांची तजवीज करणे  आहे.

केंद्र सरकारने  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या निर्देशानुसार, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या  केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाखालील रुग्णालयांसह  खासगी रुग्णालयाही (राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमधील) खालील गोष्टी सुनिश्चित करतीलः

  1. कोविड हेल्थ फॅसिलिटी मध्ये दाखल होण्यासाठी कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह असणे बंधनकारक नाही. संशयित बाधिताला केसनुसार CCC, DCHC किंवा  DHC संशयित वॉर्डमध्ये दाखल करता येईल.
  2. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही रुग्णासाठी सेवा नाकारता येणार नाही.  यात रुग्ण वेगळ्या शहराचा असला तरीही ऑक्सिजन किंवा अत्यावश्यक औषधांसारखे उपचार यांचा  समावेश आहे.
  3. ज्या शहरात  रुग्णालय आहे तिथले  वैध ओळखपत्र सादर करण्यास सक्षम नसल्याच्या कारणावरून कोणत्याही रूग्णाला प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही.
  4. रुग्णालयात दाखल करणे आवश्यकतेनुसार असावे. ज्या व्यक्तींना  रुग्णालयात दाखल होण्याची  आवश्यकता नाही अशा व्यक्तींकडून खाटा अडवल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.  रुग्णालयातून रुग्णाला घरी सोडणे सुधारित डिस्चार्ज धोरणानुसारच असेल, याचे काटेकोरपणे पालन करावे.(http://https//www.mohfw.gov.in/pdf/ReviseddischargePolicyforCOVID19.pdf)

वरील आदेशांचा समावेश करून आवश्यक आदेश आणि परिपत्रके तीन दिवसात जारी करण्याचा  सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये / केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिला आहे. ज्याची अंमलबजावणी पुढील समान योग्य धोरणापर्यंत राहील.

संशयित / पुष्टी झालेल्या कोविड 19 प्रकरणांच्या योग्य व्यवस्थापनासाठी त्रिस्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्याचे धोरण आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी सूचित केले आहे. या संदर्भात 7 एप्रिल 2020, रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शन दस्तऐवजामध्ये याबाबत  विचार केला आहे :

  1. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची काळजी कोविड केअर सेंटरमध्ये (CCC) घेतली जाईल. सार्वजनिक व खाजगी वसतिगृहे, हॉटेल्स, शाळा, स्टेडियम, लॉज इत्यादींमध्ये ती सुरू  केली गेली आहेत. शेवटचा उपाय म्हणून कोविडव्यतिरिक्त आजारांसाठी असलेली सीएचसीसारखी  रुग्णालयेदेखील  कोविड केअर सेंटर म्हणून उपयोगात आणली  जाऊ शकतील.
  2. मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांसाठी समर्पित कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आहेत. हे एकतर पूर्ण रुग्णालय असावे  किंवा शक्यतो येजा करण्याची स्वतंत्र सोय असलेला  रुग्णालयातला स्वतंत्र विभाग असावा. खाजगी रुग्णालये कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून नियुक्त केली जाऊ शकतात. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची  जोड असलेल्या खाटा असाव्यात.
  3. समर्पित कोविड हॉस्पिटल (DCH) मुख्यत्वे ज्यांना वैद्यकीयदृष्ट्या गंभीर ठरवण्यात आले आहे त्यांची सर्वसमावेशक काळजी घेण्यासाठी आहे. हे एकतर पूर्ण रुग्णालय असावे किंवा शक्यतो येजा करण्याची स्वतंत्र सोय असलेला रुग्णालयातला स्वतंत्र विभाग असावा. खाजगी रुग्णालये कोविड समर्पित रुग्णालये म्हणून नियुक्त केली जाऊ शकतात. या रुग्णालयांमध्ये आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जोड असलेल्या सुसज्ज खाटा असतील.

सीसीसीमध्ये सौम्यलक्षणे असलेल्या  केसेस, डीसीएचसीमध्ये मध्यम केसेस  आणि गंभीर प्रकरणे डीसीएचकडे दाखल करण्यासाठी उपरोक्त उल्लेखित कोविड आरोग्य पायाभूत सुविधा क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलशी जोडल्या गेल्या आहेत.

Previous articleफक्त कामावर विश्वास करणारे,पोलिस सहकारी खरच योग्य काम करतात का पाहण्यासाठी वेशांतर करुन फिरले पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश
Next articleरोगमुक्तीचा चढता आलेख कायम ठेवत गेल्या 24 तासांत 3.18 लाखांहून जास्त रुग्ण बरे झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =