शिरुर ,दि. 10 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांचे वडील माजी सैनिक नाईक सुभेदार किसन दगडू वडघुले (वय 84 वर्षे) वृध्दापकाळाने त्यांचे मुळगाव टाकळी भिमा, ता. शिरुर, जि. पुणे येथे शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या मागे एक भाऊ, दोन मुले, दोन विवाहीत मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना शिरुर माजी तालुका प्रमुख तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांचे ते वडील होत. सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये 1960 साली ते सेवेत रुजू झाले. सेवेत असताना 1962, 1965 आणि 1972 च्या युध्दांमध्ये त्यांनी सांभाळलेल्या जबाबदारी मुळे बढती झाली. 24 वर्षा नंतर सैन्यातून ‘नाईक सुभेदार’ पदावरुन त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर शिरुर तालुक्यातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सैन्यातील त्यांच्या सेवेची नोंद घेऊन ‘नाम फाऊंडेशनने’ 2017 मध्ये किसन वडघुले यांचा ‘योध्दा पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते देऊन पुण्यातील कार्यक्रमात गौरव केला होता. शिरुर शिवसेना शाखा प्रमुख बजरंग वडघुले यांचे वडील आणि टाकळी भीमा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संपत वडघुले यांचे ते बंधू होत.