पिंपरी,दि.9आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना 9 आॅगस्ट क्रांती दिनी आदराजंली वाहीली डाॅ.भारती चव्हाण राष्र्टीय महिला अध्यक्षा-अॅन्टी कोरोना टास्क फोर्स महाराष्र्ट व गोवा,अध्यक्षा – गुणवंत कामगार कल्याण मंडळ यानी केला इतिहासातील घटनाक्रमाचा उजाळा.
मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ”करेंगे या मरेंगे” हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ”आता प्रत्येकजणच पुढारी होईल.”
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.
नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.
सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.