Home ताज्या बातम्या CORONO-कोविड-19 जागतिक आजाराच्या काळात मनाचे संतुलन सांभाळा

CORONO-कोविड-19 जागतिक आजाराच्या काळात मनाचे संतुलन सांभाळा

91
0

नवी दिल्ली,दि. 31 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-जगभरात वाढत असलेले कोविड-19चे थैमान आणि त्याबद्दल दूरचित्रवाणी, समाज माध्यमे, वर्तमानपत्रे, कुटुंबातील लोक आणि मित्रमंडळी यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे सध्याचा काळ हा अतिशय खडतर झाला आहे. आपणा सर्वांनाच भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, आणि अत्यंत घाबरून जाऊन असा विचार करतो, बोलतो, किंवा असे कृत्य करतो, जे सर्वसाधारण परिस्थितीत कदाचित आपल्याला योग्य वाटले नसते.

लॉकडाऊनचे महत्व

लॉकडाऊनचा मूळ उद्देश, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारी लागण रोखणे हा आहे, जेणेकरून आपले आणि इतरांचे संरक्षण होईल. याचा अर्थ असा की, आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे, बाहेरच्या चकरा कमी करणे आणि खरंतर कुटुंबातल्या एकाच सुदृढ माणसाने गरज असेल तेव्हा घराबाहेर पडणे. जर घरात कुणी आजारी असेल ज्याला वैद्यकीय मादितीची गरज असेल तर आपल्या जवळच्या वैद्यकीय केंद्राची आपल्याला माहिती असलीच पाहिजे.

सामाजिक विलगीकरण हाताळणे

घरात राहणे थोडा काळ चांगले वाटू शकते, पण त्याचबरोबर काही दिवसांनी हे कंटाळवाणे आणि बंदिस्त असल्यासारखे देखील वाटू शकते. अशा स्थितीत, सकारात्मक आणि आनंदी राहण्याचे हे काही मार्ग आहेत.

1. व्यस्त राहा. एक नियमित वेळापत्रक ठरवून घ्या. घरकामात मदत करा.

2. संगीत, पुस्तके, दूरचित्रवाणीवरचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, यातून नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जर तुम्हाला चित्रकला, बागकाम, शिवणकाम यांसारख्या जुन्या आवडी असतील तर त्याकडे वळा. आपल्या आवडी पुन्हा एकदा वाढवा.

3. व्यवस्थित खा आणि भरपूर द्रव पदार्थ घ्या.

4. शारीरिकदृष्ट्या कार्यरत राहा. तुम्हाला सुदृढ ठेवणारे घरगुती व्यायाम करा.

5. एकमेकांची काळजी घ्या. जर तुमच्या आजूबाजूला कुणाला सल्ला, अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूंची गरज असेल तर, त्यांना ते देण्यास तयार रहा.

6. वयोवृद्ध व्यक्ती गोंधळलेल्या, हरवलेल्या असू शकतात आणि त्यांना मदतीची गरज असू शकते. त्यांना त्यांची औषधे, रोजच्या गरजेच्या वस्तू आणून द्या.

7. घरात जर मुले असतील तर त्यांना घरकामात गुंतवून ठेवा. त्यांना जबाबदारी शिकवा, नवीन कौशल्ये शिकण्यास मदत करा.

वस्तुस्थितीकडे लक्ष द्या, अफवांकडे दुर्लक्ष करा

1. माहितीमध्ये ताकद आहे. विशिष्ट समस्यांबद्दल आपल्याला जितकी जास्त माहिती असते, तितकी आपली भीती कमी होते. स्वतःच्या बचावासाठी सर्वात विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती घ्या आणि त्यावरच विश्वास ठेवा.

2. आपल्या मनावर परिणाम करू शकणाऱ्या खळबळजनक बातम्या आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करा. खात्री न करता कुठलीच बातमी आणि माहिती पसरवू नका.

3. कोण आणि कसं आजारी पडलं याची जास्त चर्चा करू नका. त्यापेक्षा कोण बरं झालं त्याची माहिती घ्या.

4. स्वच्छता आणि इतरांपासून अंतर ठेवण्याच्या सल्ल्याचं काटेकोरपणे पालन करा. हे स्वतःची तसेच इतरांची देखील काळजी घेणेच आहे.

5. सर्वसामान्य सर्दी पडसे म्हणजे कोरोना संसर्ग नव्हे. कोरोनाची लक्षणं व्यवस्थित सांगितलेली आहेत. शिंकताना, खोकताना शिष्टाचार पाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

6. अनेक रुग्णांमध्ये, कोरोनाच्या संसर्गाची किरकोळ लक्षणं दिसून येतात आणि त्या व्यक्तीने संसर्ग कमी होईपर्यंत सामाजिक विलगीकरण कटाक्षाने पाळायचे असे. हा काळ साधारणपणे दोन आठवड्यांचा असतो. किरकोळ लक्षणांसाठी रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याची गरज नसते. केवळ ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशांनाच इस्पितळात दाखल करावे लागते. अधिकांश लोक यातून बरे होतात.

भावनिक प्रश्न हाताळणे

1. अस्वस्थ वाटत असेल तर काही मिनिटे हळूहळू श्वासोच्छवास करा. अस्वस्थ करणारे विचार प्रयत्नपूर्वक दूर ठेवा. काही शांत आणि सुंदर विचारांनी मन शांत करा.

2. अस्वस्थ वाटत असेल आणि चिडचिड होत असेल तर 10 ते 1 पर्यंत आकडे उलटे मोजा, मन दुसरीकडे वाळवा.

3. भीती वाटत असेल तर स्वतःला हे विचारून ती स्थिती हाताळा:

a. माझे कशावर नियंत्रण आहे?

b. काही तरी वाईटच होणार आहे या विचाराने मी उगाचच काळजी करत आहे का?

c. आधी जेव्हा मी तणावात होतो, तेव्हा मी ते कसे हाताळले होते?

d. स्वतःला सावरायला आणि सकारात्मक ठेवायला मी काय काय करू शकतो?

4. दुःखी आणि एकटे वाटणे देखील सामन्य आहे. इतरांशी संपर्कात राहा. कुटुंब आणि मित्रांशी संपर्कात राहिल्याने मोठी मदत होते. ज्यांना आपण भेटलो नाहीत अशांना फोन करून आश्चर्याचा धक्का द्या. चांगल्या घटनांची चर्चा करा, समान आवडी निवडींची चर्चा करा, पदार्थांच्या कृती एकमेकांना सांगा, गाणी आणि संगीत शेयर करा.

5. जर प्रयत्न करूनही या भावना मनातून अनेक दिवस जात नसतील, तर त्याविषयी कुणाशी तरी बोला. जर परिस्थिती आणखी बिघडली तर त्या व्यक्तीला हतबल, निराश आणि जीवन व्यर्थ वाटू शकते. असे झाल्यास मानसोपचार तज्ञाच्या मदतीसाठी (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा किंवा आपल्याडॉक्टरांशी संपर्क करा.

काय करू नये

1. तंबाखू, दारू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन टाळा. मानसिक स्थितीवर उपाय म्हणून किंवा कंटाळा घालविण्यासाठी तंबाखू, दारू किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन शारीरिक आणि मानसिक स्वस्थ बिघडवून रोग प्रतिकार शक्ती कमी करू शकते. ह्या पदार्थांचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींना तणावाच्या आणि उदास वाटण्याच्या परिस्थितीत तज्ञांची मदत लागू शकते.

2. कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तींना वाळीत टाकू नका. तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून जसे सामाजिक विलगीकरण गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्या परिचयात कुणाला संसर्ग झाला असण्याची शक्यता असेल तर त्यांना खबरदारीचे उपाय आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबद्दल माहिती द्या.

3. जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालाच, तर लक्षात ठेवा, बहुतांश लोक यातून बरे होतात. घाबरून जाऊ नका. स्वतःला विलग करा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या.

बरे झाल्यावर मानसिक समस्या

1. कोविड संसर्गातून बरे होण्याची भावना सुंदर असली तरी, पूर्ण बरे झाल्यावर समाजात पुन्हा जाताना तणाव वाटू शकतो. आपले कुटुंबीय आणि प्रिय व्यक्ती आजारी पडू शकतील अशी भीती आपल्याला वाटू शकते.

2. ज्या लोकांना या आजाराबद्दल माहिती नाही, ते तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात. हे अतिशय तणावपूर्ण आणि एकटे पाडणारे असू शकते.

3. काही काम किंवा इतरांची मदत न करू शकल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटू शकते. यामुळे नैराश्य, असहायता आणि चिडचिड होऊ शकते.

4. ह्या विचारांचा सामना करण्यासाठी वर सांगितलेले उपाय करावे. कोविड संसर्गातून बरे होणे शक्य असल्याचा आपला सकारात्मक अनुभव इतरांना सांगा.

आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना असलेल्या मानसिक समस्या ओळखा

ज्याप्रमाणे आपण आपल्या मानसिक समस्या ओळखतो, त्याप्रमाणेच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना भेडसावत असलेल्या अशा समस्यांविषयी संवेदनशील राहणे गरजेचे आहे. या समस्या खालील प्रमाणे असू शकतात:

1. झोपेच्या पद्धतीत बदल.

2. झोप न लागणे आणि एकाग्रता न होणे

3. आरोग्याच्या समस्या वाढणे

4. दारू, तंबाखू किंवा अमली पदार्थांचे सेवन वाढणे

त्यांना मदतीचा हात द्या. जर समस्या सुटली नाही तर (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा किंवा आपल्या डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.

मानसिक आजार असलेल्या व्यक्ती

ज्या व्यक्ती आधीपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना सध्याच्या कोविड आजार आणि स्वयं अलगीकरणाच्या पार्श्वभूमीवर नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

1. त्यांनाही इतर लोकांसारखीच भीती किंवा मानसिक तणावाची भावना त्रास देऊ शकते, त्यांच्या आधीच्या मानसिक आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना अधिक ताण पडण्याची शक्यता असते.

2. सामाजिक अलगीकरणामुळे त्यांना, वेगळे ठेवल्याची भावना वाढून चिडचिडेपणा अथवा त्रागा होऊ शकतो.

3. त्यांना औषधे आणि समुपदेशनाची मदत सहज उपलब्ध न होण्याची शक्यता असते.

त्यामुळे अशा मानसिक रुग्णांना या काळात मदत व आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि इतर लोकांनी ही काळजी घ्यायला हवी. आरोग्य विषयक हेल्पलाईनमधूनही त्यांना आधार दिला जाऊ शकेल, त्याशिवाय त्यांची नियमित औषधे त्यांना दिले जातील याचीही काळजी घ्यायची आहे.

लक्षात ठेवा, उत्तम मानसिक आरोग्यामुळेच या संकटकाळात खंबीर राहूनच आपण ही लढाई जिंकू शकतो!

 

Previous articleआर्थिक वर्षाला मुदतवाढ नाही
Next articleमालवाहू विमानांद्वारे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 20 =