नवी दिल्ली,दि.२८ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटकालीन आणि तणावाच्या घडीला कर्मचारी आणि कामगार यांची संपूर्ण काळजी घेण्याचा सल्ला केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योग आणि व्यापारी संघटनांना दिला आहे. कोविड-19 प्रसाराचे आणि देशात करण्यात आलेल्या संपूर्ण बंदीचे व्यापारी जगतावर होत असलेले परिणाम जाणून घेऊन देशभरातील उत्पादन तसेच औद्योगिक क्षेत्रातील संघटना आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचे अनुभव आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना समजून घेण्यासाठी आज नवी दिल्ली इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.कामगार हे उद्योग जगताची मौलिक मालमत्ता तसेच साधनसंपत्ती आहेतच. पण या जागतिक महामारीच्या दिवसांत त्यांना मोठ्या जमावाने देशभरात कुठेही किंवा ग्रामीण भागात फिरू दिले तर ते कोविड-19 विषाणू संसर्गासाठीचे वाहक होणे शक्य आहे. म्हणूनच त्यांना नोकरीवरून काढून टाकणे किंवा स्वच्छेने नोकरी सोडून जाऊ देणे धोकादायक आहे असे ते म्हणाले. देशाला आणि समाजाला या समस्येतून सोडविण्यासाठी सेवाभावी वृत्ती आणि निःस्वार्थीपणाने काम करण्याचा आग्रह त्यांनी यावेळी बोलताना धरला. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना संपूर्ण पाठींबा देण्यास सरकार वचनबद्ध आहे आणि मदत तसेच समाजात विश्वास निर्माण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दल उद्योग जगताने जनजागृती करावी, विविध धार्मिक नेत्यांसह समाजावर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून वारंवार हात धुणे, समाजात वावरताना दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर राखणे यासारख्या अनेक आरोग्यविषयक सावधगिरीच्या उपायांचा प्रसार करावा अशा अपेक्षा त्यांनी उपस्थित प्रतिनिधींकडून व्यक्त केल्या.यावेळी अनेक प्रतिनिधींनी देशातील बंदीच्या उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांना उत्तर देताना, केंद्र सरकारने कोणत्याही वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध आणलेले नाहीत हे गृह व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकातून स्पष्ट होते असे गोयल यांनी सांगितले. कोरोनाला रोखण्याबाबतची सर्व खबरदारी घेऊन अत्यावश्यक सेवा आणि सुविधा सुरु राहतील असे त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीमुळे तणावाखाली वावरत असलेल्या कर्मचारी आणि कामगार वर्गाला दिलासा देण्यासाठी काही उद्योगांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच समाजसेवा म्हणून व्हेंटिलेटर्स सारख्या सध्या अत्यावश्यक असलेल्या साधनांची निर्मिती आणि गरजू लोकांसाठी अन्न पुरविण्यासारख्या प्रयत्नांना दाद दिली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देशातील उद्योग जगतासमोरच्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. या जागतिक संकटातून आपला देश लवकरच बाहेर पडेल आणि अधिक मजबुतीने पुन्हा सर्व क्षेत्रात प्रगती करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केला.सर्व उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत कामगारांना आणि मजुरांना आहेत त्याच ठिकाणी वेतन देऊन थांबवून ठेवावे, त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली तर देशातील संपूर्ण बंदीचा उद्देश विफल होईल आणि कोविड-19 संसर्गाचे संकट टळल्यानंतर देशाला सावरायलाही वेळ लागेल असा इशारा या बैठकीला उपस्थित रसायने आणि खते तसेच नौवहन (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिला.
Home ताज्या बातम्या कामगारांना स्थलांतरित होण्यापासून रोखण्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा उद्योग आणि व्यापारी...