Home ताज्या बातम्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी...

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

46
0

मंबई,दि.२९ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही गर्दी थांबवा, कठोर पावले टाकायला भाग पाडू नका असे म्हटले आहे.

आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सर्वांचे सहकार्य

आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, विरंगुळ्याचे, कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, विरोधीपक्ष नेते, मंत्रीमंडळातील सहकारी, राज ठाकरे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो असेही ते म्हणाले.

मदतीचे अनेक हात

काल मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड १९ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. उदय कोटक यांनी १० कोटी रुपयांची मदत केली आहे. कंपन्या, उद्योजक पुढे येत आहेत, कुणी रुग्णालय सेटअप उभे करत आहे तर कुणी मास्क पुरवित आहे. एक चांगली टीम या निमित्ताने तयार झाली आहे, काम करत आहे.

जिथे आहात तिथेच थांबा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची

इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे, महाराष्ट्र शासनाने त्यांची सम्पूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी १६३ केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे.

तर, सीएमओशी संपर्क करावा

तसेच महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे, अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करावा, त्यांना संबधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल.

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरु

कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तू, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये असे आवाहनही केले.

पाच रुपयात शिवभोजन

ही आरोग्याशी संबंधित लढाई असल्याचे सांगून एकत्रित प्रयत्नातून आपल्याला ती जिंकायची आहे, त्यासाठी जबाबदारीने वागायचे आहे.  राज्यात शिवभोजन केंद्रात कार्ड असो वा नसो आता पाच रुपयात लोकांना पुढची तीन महिने जेवण देण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

डॉक्टरांनीच माझे मनोधैर्य वाढवले

कस्तूरबा आणि नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझेच मनोधैर्य वाढले इतक्या सुंदर प्रकारे आपले हे आरोग्य सेवेतील लोक काम करत आहेत. त्यांच्या मनात कुठलीही भीती नाही, हे डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे सर्व लोक हे खरे शुरवीर आहेत, मला त्यांचा अभिमान वाटतो, जीवावर उदार होऊन ते काम करत आहेत हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

राज्यात चाचणी केंद्रे वाढली

राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत, त्यामुळे कोरोना पॉझेटिव्हची संख्या वाढेल ही अपेक्षा आहेच परंतू अपेक्षेपलिकडे ही संख्या जाता कामा नये, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खाजगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्या या तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे कारण लक्षणाची तीव्रता कमी असतांनाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो.

होम क्वारंटाईन लोकांनी घराबाहेर पडू नये

होम क्वारंटाईन लोकांनी कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी स्वत:ला घरातच ठेवावे असे सांगतांना घरातील 60 वर्षावरील वयस्क माणसे, गरोदर स्त्रिया, मधुमेह, उच्चरक्तदाब असलेले माणसे यांना जपावे, असेही मुख्यमंत्री म्हणालेविषाणुचा गुणाकार न होऊ देता त्याची वजाबाकी करावयाची असल्याने हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रविवार असला तरी घरीच बसावे विषाणुला हरवण्यासाठी संयम, जिद्द कायम ठेवावी, आपणहे युद्ध नक्की जिंकू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleलॉकडाउनच्या काळात गरजुंना शिजवलेले अन्न पुरविण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज
Next articleकोविड-19 विरुद्ध मुकाबला करण्यासाठी लोकसभा स्थानिक क्षेत्र विकास सदस्य योजना फंडातून योगदान देण्याचे उपराष्ट्रपतींचे राज्यसभा खासदारांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − five =