Home ताज्या बातम्या पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

0

नवी दिल्ली,दि.२४ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अपयशी ठरलो तर देश २१ वर्ष मागे जाईल. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. त्यामुळे नागरिकांनी पुढील २१ दिवसांसाठी घरातून बाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.जगातील सामर्थ्यशाली देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत.या देशांकडे साधनांची कोणतीही कमतरता नाही किंवा ते प्रयत्न करत नाहीत, असेही नाही. मात्र, कोरोना विषाणू इतक्या वेगाने फैलावत आहे की, सर्व तयारी करूनही या देशांपुढील समस्या वाढतच आहेत. त्यामुळे आपण असाच निष्काळजीपणा सुरु ठेवला तर आगामी काळात देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अर्थात एकमेकांपासून दूर राहणे, हाच एकमेव उपाय आहे. अन्यथा काही लोकांच्या बेपर्वाईमुळे अनेक कुटुंब आणि संपूर्ण देश धोक्यात येऊ शकतो, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इटलीतील आरोग्य व्यवस्थेचाही दाखला दिला. सध्याच्या घडीला या दोन देशांतील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम मानल्या जातात. मात्र, त्यांनाही कोरोनाला रोखण्यात अपयश आले. सुरुवातीला ६७ दिवसांत एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर दोन लाखांपर्यंतचा टप्पा अवघ्या ११ दिवसांत तर त्यानंतरच्या चार दिवसांतच कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांवर पोहोचली, याकडे लक्ष वेधत मोदींनी कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात भारताल मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. मात्र, सध्याच्या घडीला माझ्यासाठी प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य सरकारांनाही आरोग्य व्यवस्थेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मोदींनी यावेळी सांगितले.
अतिशय कळकळीची विनंती करत मोदींनी देशवासियांचा वेळ मागितला.

पंतप्रधानांच्या भाषणात काही ठळक मुद्द सांगितले

जनता कर्फ्यूमध्ये दिलेली साथ ही प्रशंसनीय आहे. तुम्ही सारे कोरोनाविषयीच्या बातम्या पाहात आहात. अनेक विकसित देशांनाही या महामारीने हतबल केलं आहे. असं, नाही की हे देश प्रयत्न करत नाही किंवा त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे. पण, कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे की तयारी करुनही आव्हानं वाढत आहेत.

जवळपास दोन महिन्यांच्या निरिक्षणातून एक निकाल समोर आला आहे की या महामारीशी दोन हात करण्यासाठी गर्दी टाळणं हाच एकमात्र उपाय आहे. एकमेकांपासून दूर राहण, घरांमध्ये बंद राहणं हाच कोरोनापासून वाचण्याचा मार्ग आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही उपाय नाही. त्यामुळे कोरोनाला पसरण्यापासून थांबवायचं असल्यास ही साखळी तोडायलाच हवी.

गर्दी टाळणं ही प्रत्येकाची गरज आहे. पंतप्रधानांनासुद्धा हा नियम लागू आहे. बेजबाबदारपणा, चुकीची विचारसरणी तुम्हाला, कुटुंबाला आईवडिलांना मित्रांना आणि पुढे जाऊन संपूर्ण देशाला मोठ्या अडचणीत टाकेल. असा बेजबाबदारपणा सुरु राहिला तर, भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल याचा अंदाजही लावता येणार नाही.

आज एक मोठा निर्णय जाहीर होत आहे. आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन होणार आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी आज रात्री बारा वाजल्यापासून घरातून निघण्यासाठीही प्रतिबंध असतील. जिल्हे, केंद्रशासित प्रदेश सर्वकाही लॉकडाऊन असेल. हा कर्फ्यूच आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही हा महत्त्वाचा निर्णय आहे.

लॉकडाऊनचा आर्थिक फटका देशाला बसणार आहे. पण, तुमचे प्राण वाचवणं यावेळी माझी, राज्य सरकारची प्रत्येक स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मी प्रार्थना करतो की यावेळी जिथे कुठे आहात तिथेच थांबा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसांचा वेळ आवश्यक आहे. 21 दिवस नाही सांभाळले तर देश खूप मागे जाईल. त्यामुळे घरात राहा कारण, या लॉक़डाऊनने एक लक्ष्मणरेषा आखली आहे.

अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी अनेक दिवस लागलात यादरम्यान तो व्यक्ती अजाणतेपणे अनेकांना संक्रमित करतो. जगभरात कोरोनाने संक्रमित होणासाठी पहिल्या एक लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 67 दिवस लागले, त्यानंतर 11 दिवसांमध्येच पुढील 1 लाखांना कोरोनाची लागण झाली. तीन लाखांवर पोहोचण्यासाठी 4 दिवस लागले. हे अतिशय भयावह आहे. प्रगत देशही यापुढे हतबल झाले पण, त्यांच्या अनुभवातूनही शिकायला हवं. शंभर टक्के आदेशांचं पालन झालं त्यामुळेच आता हे देश यातून बाहेर पडले आहेत.
काहीही होऊद्या, घरातच राहायचंय …. गर्दी टाळा पंतप्रधानांपासून गावातील छोट्याश्या नागरिकापर्यंत सर्वांनीच आता थांबा. संकट कमी कसं करता येईल याचा विचार करा. संकल्प आणखी दृढ करा. पावलोपावली संयम ठेवा लक्षात ठेवा ‘जान है तो जहान है’. लॉकडाऊन आहे तोपर्यंत संकल्प आणि वचन पार पाडायचं आहे. तुमच्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, त्यांचा विचार करा. रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्यांचा विचार करा. इतरांची सेवा करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. तुमचा समाज, परिसर निर्जंतुक करण्यासाठी झटणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. माध्यमांच्या प्रतिनिधींचा विचार करा. जे संक्रमणाचा विचार न करता सतत कार्यरत आहेत. पोलिसांचा विचार करा. जे तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत इतरांचा रोषही पत्करत आहेत.

केंद्र आणि राज्यसरकार प्रयत्नशील आहे. दैनंदिन जीवनामध्ये अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यामध्ये अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरिबांना अडचण होऊ नये यासाठी प्रशासनासोबतच अनेकजण एकत्र येत आहेत. आयुष्य वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टींना प्राधान्य द्यावंच लागणार आहे.

पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करत आरोग्यसेवा, आयसोलेशन बेडची संख्या वाढवली जाणार आहे. मेडिकल आणि पॅरामेडिकल प्रशिक्षणातही वाढ होणार आहे. आरोग्यसेवांनाच प्राधान्य देण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.

एकच विनंती करतो, कोणत्याही प्रकारच्या अफवेपासून दूर राहा. केंद्र राज्य आणि आरोग्य विभागाच्या आदेशांचं पालन करा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. आरोग्यास घातक ठरु शकतं. स्वत:ची काळजी घ्या निकटवर्तीयांची काळजी घ्या. विजयाचा दृढ निश्चय करत या बंधनांचा स्वीकार करा.

Previous articleसरकारचा आदेश जुगारुन नागरीक रस्त्यावर अखेर नाइलाजस्तव देहुरोड पोलिसाना द्यावा लागतोय महाप्रसाद
Next articleनागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारच्या सूचनांचे पालन करावे- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 12 =