तळेगाव, दि. १९ आॅक्टोबर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) –
गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता थंडावली. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास निवडणुकीचा प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपापला प्रचार थांबवला.
तत्पूर्वी, शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे मावळमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर पक्षांच्या उमेदवारांनी जीवाचे रान करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपचे उमेदवार बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके या दोन तुल्यबळ उमेद्वारांमध्येच मावळ मतदारसंघाची खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न करून संपूर्ण मावळ तालुका पिंजून काढला असला तरी प्रचारात खऱ्या अर्थाने आघाडी घेतली ती, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांनीच. त्यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच प्रचार दौरे सुरु केले. त्यांच्या झंझावाती दौऱ्यांनी मावळ तालुका ढवळून निघाला. प्रचार फेरी, पदयात्रा, कोपरा सभा, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी यावर भर देत सुनिल शेळके यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. शनिवारच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी भरपावसात काढलेल्या रॅलीस तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मावळ तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकासाची गंगा अद्याप दुर्गम भागातील खेडोपाडी, गावांमध्ये पोहोचली नाही, शहरी भागातही रस्ते, वाहतूक या समस्या आहेतच. गेली दहा वर्षे विधानसभेत मावळचे नेतृत्व करणाऱ्या विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्या कार्यपद्धतीवर मावळवासीयांची नाराजी आहे. तालुक्यासाठी आणलेल्या १४०० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके यांची कामाची तळमळ सर्वसामान्यांना भावते आहे. नगरसेवक असताना त्यांनी केलेली विकासकामे लक्षणीय आहेत. शिवाय अनेकवेळा त्यांनी स्वखर्चाने काही कामे केली आहेत. त्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल प्रचंड आदराचे स्थान आहे. या कामांमुळे सुनिल शेळके यांनी विद्यमान आमदारांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्या प्रचारदौऱ्यांना मिळणार प्रचंड प्रतिसाद मावळचा शिलेदार बदलणार असल्याची चिन्हे आहेत, अशी चर्चा सध्या मावळात रंगली आहे.