तळेगाव, दि. १९आॅक्टोबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ तालुक्यात मी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा कौल स्पष्ट दिसत असल्याने विरोधक बावचळले असून कार्यकर्त्यांना त्रास देणे सुरु केले आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचून माझे मतदारच धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली. जोशी वाडा परिसरात कोपरासभा घेऊन शेळके यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुलोचनाताई आवारे तसेच किशोर आवारे, हेमलता काळोखे, ऍड. रुपालीताई दाभाडे, विजय काळोखे, रोहित लांघे, अनिता पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेळके म्हणाले की, मावळवासीयांनी मला खूप प्रेम दिले. भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळेच माझ्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, सत्तेचा वापर करून नोटीस पाठवणे, त्यांना धमकावणे सर्वसामान्य तरुणांना व महिला-भगिनींना त्रास देणे चालू केले आहे. पण याचा आमच्या कार्यकर्त्यांवर काहीही परिणाम होणार नाही. मावळचे जनताच त्यांना जागा दाखवून देईल.
गणेश खांडगे, किशोरभाऊ आवारे, बाप्पूअण्णा भेगडे, गणेश काकडे यांनी माझ्यावर सख्ख्या भावसारखे प्रेम केले. दोन पावले मागे येत मावळच्या विकासासाठी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि प्रचारात देखील त्यांनी खूप मेहनत घेतली. आतापर्यंत माझ्यावर विश्वास दाखवला तसाच विश्वास अजून दोन दिवस दाखवावा आणि भरभरून मतांचे दान पदरात टाकावे, असे आवाहन सुनील शेळके यांनी केले.