पिंपरी,दि 9 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात तुफान फटकेबाजी केली. चोऱ्यामाऱ्या करून इथपर्यंत आला आहात. ज्यांनी तुम्हाला घडविले, समाजकारण आणि राजकारणात आणले ते गुरू विलास लांडे यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसले आहे. मतदारसंघातील नागरिकांना “व्हिजन २०-२०” चे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात “व्हिजन टपरी-टपरी” राबविले. चालू आमदारांनी मतदारसंघात हफ्ता वसुलीची संस्कृती रुजविली आहे, अशी घणाघाती टिका दत्ता साने यांनी केली. दंड आणि मांड्या थोपटणाऱ्या पैलवानाला या निवडणुकीत वस्ताद विलास लांडे हे चितपट करणारच, असा विश्वास साने यांनी व्यक्त केला.
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचाराचा नारळ भोसरीतील भैरवनाथ मंदिरात फोडण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात तुफान फटकेबाजी करत भोसरी मतदारसंघ भयमुक्त, दहशतमुक्त आणि दादागिरीमुक्त करण्याचा नारा साने यांनी दिला.
दत्ता साने आपल्या भाषणात म्हणाले की, “मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत आणि जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. निवडणुकीत ज्या पारड्यात मी माप टाकतो, ते पारडे विजयी होते हा इतिहास आहे. राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिक सुखी होते. मात्र गेल्या पाच वर्षांचा काळाबाबत प्रत्येक नागरिकाला विचारल्यास त्यांच्या मनात दुःख आहे. कमळाबाईला निवडून देऊन चूक केल्याचे नागरिक सांगतात. मी विरोधी पक्षनेतेपदावर काम करत असताना महापालिकेत भाजपने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम केले.
भोसरीतील शीतलबाग येथे ७० लाखांचा पादचारी पूल साडेसात कोटी खर्च करून उभा करण्यात आला. करदात्यांचे कोट्यवधी रुपये कुणी खाल्ले हे तमाम भोसरीकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही. हा पूल उभारल्यानंतर आजतागायत कुत्रे सुद्धा त्या पुलावरून गेले नाही. गरज नसताना हे पुल उभारून कोट्यवधी रुपये लाटले गेले. महापालिकेने भोसरीत उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्यास निघाले होते. स्वतःचा धंदा व्हावा म्हणून हा डाव रचला गेला होता. मात्र नगरसेवक रवि लांडगे यांनी मोर्चा काढून, तर मी महापालिकेत विरोध करून हा डाव हाणून पाडला. त्याबद्दल मी रवि लांडगे यांचा आभारी आहे. मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प स्वतःच्या हितासाठी उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी ठेकेदाराला ५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जागा महापालिकेची म्हणजे जनतेची आणि धंदा यांचा, असा हा कारभार सुरू आहे.
मतदारसंघातील नागरिकांना “व्हिजन २०-२०” चे स्वप्न दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मतदारसंघात “व्हिजन टपरी-टपरी” राबविण्यात आले. प्रत्येक टपरीधारक, हातगाडीधारक आणि सर्वसामान्य कामगारांकडून दररोज हफ्ता वसूल केला जातो. विलास लांडे हे आमदार असतानाच्या काळात मतदारसंघात कोणीही हफ्ता मागत नव्हते. मात्र चालू आमदारांनी मतदारसंघात हफ्ता संस्कृती रुजविली. या हफ्तेखोरांना आता घरी बसविण्याची आपणा सर्व जनतेची जबाबदारी आहे. मतदारसंघात प्रचंड दहशत निर्माण करण्यात आली आहे. दहशतीमुळे कोणी नागरिक समोर येऊन बोलण्यास तयार होत नाही. पण प्रत्येकाने माझा भोसरी मतदारसंघ दहशतमुक्त, भयमुक्त, दादागिरीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची खूणगाठ मनाशी बांधली आहे.
माझे तोंड बंद करण्यासाठी ऑफिस फोडण्याचा प्रयत्न झाला. पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हजारो आले तरी त्यांना आडवे करण्याची ताकद माझ्यात आहे. विरोधात लढणाऱ्यांनी आपणाला कोणी घडविले याचे आत्मपरीक्षण करावे. हे आमदार नसताना यांचा संध्याकाळी सहानंतर फोन का बंद असयचा हे आम्हाला माहिती आहे. चोऱ्यामाऱ्या करून आपण इथपर्यंत आला आहात हे विसरू नये. विलास लांडे यांनी तुम्हाला घडविले. ते तुमचे गुरू आहेत. तुम्हाला समाजकारण आणि राजकारणात लांडे यांनीच आणले. तुम्ही त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले आहे. दंड आणि मांड्या थोपटणाऱ्या पैलवानाला वस्ताद विलास लांडे या निवडणुकीत चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यासोबत आहे. आता कार्यकर्त्यांनी लांडे यांचे निवडणूक चिन्ह कपबशी हे घराघरांत पोहोचवण्याचे काम करावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दत्ता साने यांनी केले.”