Home कोल्हापुर पूरग्रस्तांची घरे फोडणारी टोळी गजाआड

पूरग्रस्तांची घरे फोडणारी टोळी गजाआड

64
0

कोल्हापूर,दि.८ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मदतीच्या बहाण्याने पूरग्रस्तांची घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह किमती ऐवजावर डल्‍ला मारणार्‍या टोळीला म्होरक्यासह करवीर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकून 19 तोळे दागिन्यासह सहा लाखांचा ऐवज हस्तगत केला. चोरट्यांनी करवीर, राधानगरी व भुदरगड तालुक्यांतील घरफोडीच्या 11 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यातीलही अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.म्होरक्या आकाश रघुनाथ चव्हाण (वय 27, रा. मूळगाव कोते, ता. राधानगरी, सध्या रा. वडणगे, ता. करवीर), योगेश बाबुराव संपकाळ (31, लोणार वसाहत, रा.उचगाव, ता. करवीर), धोंडिराम ऊर्फ रामा रंगराव पाटील (33, रा. वडणगे, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीतील आणखी दोघांचा सहभाग असावा, असा संशय आहे. संशयितांच्या नावासह टोळीच्या कारनाम्याची लवकरच व्याप्ती उघडकीला येईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संशयितांनी पूरग्रस्तांच्या चोरलेल्या दागिन्यासह अन्य किमती ऐवज तीन सराफांना विक्री केल्याचेही उघड झाले आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. करवीर तालुक्यात वडणगे, चिखली, शिंगणापूर, नागदेववाडी, फुलेवाडी, रिंगरोड, पीरवाडी, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, आर.के.नगर, तर राधानगरी तालुक्यातील कोते येथील मंदिर, दूध डेअरी, राशिवडे येथील घरफोडीच्या गुन्ह्यांची म्होरक्याने कबुली दिली आहे, असेही ते म्हणाले.
आकाश चव्हाणसह साथीदारांनी महापूर काळात केलेल्या घरफोडी, चोरीच्या कारनाम्याचा करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील व गुन्हे प्रगटीकरण पथकाला सुगावा लागला. पथकाने म्होरक्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने उडवाउडवी सुरू केली. पोलिसी खाक्या मिळताच चौकशीतून दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. योगेश संकपाळ, धोंडिराम पाटील यांना ताब्यात घेऊन तिघांचीही स्वतंत्र चौकशी केली असता 11 गुन्हे उघडकीला आले आहेत. टोळीकडून मोटारसायकल, 19 तोळ्यांचे दागिने, चांदीच्या दागिन्यासह गणेश, स्वामी समर्थांचीही मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे. महागडा संगणक, मॉनिटर असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सुनील पाटील आदी उपस्थित
होते.

स्वत:च्या गावातील मंदिर फोडून गणेश मूर्ती पळविली ,म्होरक्या आकाश चव्हाण मूळचा कोते गावचा. चैनीसाठी साथीदारांना हाताशी धरून त्याने गावातील मंदिरासह दानपेटी फोडली. मंदिरातील पंचधातूची गणेशाची सुबक, स्वामी समर्थ व कासवाची मूर्तीही लंपास केली. मंदिर फोडल्यानंतर संशयितांनी स्वत:च दुसर्‍या दिवशी आरडा-ओरड करून गावात ताण-तणावाचा प्रयत्न केला होता.अखेर टोळीचे बिंग करवीर पोलिसांनी फोडले. न्यायालयाने टोळीतील साथीदारांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. टोळीला जेरबंद करण्यासाठी उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, प्रशांत माने,राजू जरळी, दीपक घोरपडे, गुरू झांबरे, सुहास पाटील, युक्‍ती ठोंबरे, राम माळी, सचिन बेंडखळे आदींनी प्रयत्न केले.

Previous articleवंचित आघाडीची पहिली यादी जो पर्यंत जाहीर होत नाही, तो पर्यंत काँग्रेससाठी १४४ जागांचा प्रस्ताव कायम
Next articleविधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − 1 =