Home ताज्या बातम्या राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर उर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण :-...

राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर उर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण :- चंद्रशेखर बावनकुळे

197
0


पुणे ,दि.26जुलै2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :-   यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची शासनाची योजना असून पुढच्या पाच वर्षात राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. 

येथील अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)चा 35 वा वर्धापनदिन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाजनकोचे (माईंनिग) सल्लागार व संचालक पुरुषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप उपस्थित होते. 

श्री.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देशातील सर्वात जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र करतो. सन 2024 पर्यंत 175 गिगा वॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी देशा समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील. गेल्या पाच वर्षात शासनाने राज्यातील वीज नसलेल्या 19 लाख कुटूंबियांना वीज देण्याचे काम केले आहे.

राज्यासह देशाची प्रगती ही ऊर्जा निर्मितीवर अवलंबून असते. जे राज्य प्रतिमाणसी अधिक उर्जेचा वापर करते, ते राज्य प्रगत म्हणून ओळखले जाते. आपल्याला महाराष्ट्राला सर्वात अग्रेसर ठेवायचे आहे. त्यासाठी महाऊर्जा राज्याला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने शासनाने धोरण तयार कले आहे. त्याच बरोबर स्वस्त वीज निर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, संपूर्ण देशाच्या विकासाचा प्राण ही ऊर्जा आहे. आजही आपण 61 टक्के वीज औष्णिक उर्जा केंद्रातून निर्माण करतो. त्यामुळे मोठे प्रदूषण होते, त्यावर मात करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऊर्जा बचतीबाबत गावोगावी जाऊन प्रबोधन करण्यासाठी तयार केलेल्या विशेष वाहनाला हिरवा झेंडा दाखवून ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचा शुभारंभ केला. ऊर्जा संवर्धन कार्ड व महाऊर्जावर आधारित चित्रफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पाडावा: – विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर
Next articleअपंगत्वाचे प्रमाण ८० टक्के असलेल्या दिव्यांगाना मोफत घर मिळणार:- डॉ. सुरेश खाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − fourteen =