रावेत,दि.२३ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- एका तालात थिरकणारे पाय… दांडियाच्या अन् कानावर पडणाऱ्या संगीताच्या तालावर घुमणारे विविधरंगी घागरे आणि रास गरब्यांच्या रंगांबरोबर रंगलेली तरुणाई असा नवरात्रोत्सवाचा जल्लोष सध्या रावेत येथे पहावयास मिळत आहे.नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्रीत भक्तीसोबत रंग आणि आनंदाची उधळण होत असते. हाच आनंद द्विगुणित करून यंदाच्या उत्सवाचे रंग अधिक गडद करण्यासाठी रावेत येथील मा नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी रावेत प्राधिकरणातील मैदानावर भव्य नवरात्र उत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.
पारंपरिक गुजराती वेशातील हजारो तरुण आणि तरुणी जोडीला बहारदार गाणी अशा उल्हासपूर्ण वातावरणात रावेत येथे रास दांडिया रंगला आहे. वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटक्या संयोजनामुळे रावेतवासीया सह बाजूच्या उपनगरातील तरुणाई रावेत येथील नवरात्रोत्सवात दंग आहेत. तरूण-तरुणींची गर्दी वाढत आहे. पारंपरिक पेहरावातील तरुणाईने दांडियाचा उत्साह वाढवला आहे. येथील रास दांडिया आबालवृद्धांचे आकर्षण ठरले आहे. वैविध्यपूर्ण नेपथ्य, आकर्षक रोषणाई आणि उत्तम वाद्यवृंदाने सर्वांना आकर्षित केले आहे. नव्या वळणाचा दांडिया ठेका सादर करून तरूणांनी धमाल उडवली आहे.
मराठमोळी संस्कृती जोपासत तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवा नेते कुणाल भोंडवे यांच्या नेतृत्वात बाबासाहेब पाटील, राजेश शिंदे, बाळासाहेब कुंभार, आर आर शिंदे,रोहन भुर्के,गौतम तुंगारे, सोमनाथ हरपुडे, मनिष शर्मा,प्रसाद राजगुरव,रुपेश हांडे यांनी आयोजन केले आहे.
सुरक्षित महिला संकल्प उद्देश डोळ्यासमोर ठेवून दांडियाचे आयोजन केले आहे. या संकल्पासाठी जयश्री भोंडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इंद्रजा भोंडवे,स्वाती कोंडे,लीना भुर्के,वर्षा आटोळे,सपना अग्रवाल,स्वाती पाटील,प्रणाली हारपुडे, रजनी बडगुजर,माधुरी शिंदे,नंदा शिंदे आदी महिला महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम करीत आहेत.
उत्कृष्ट नृत्य आणि वेशभूषेसाठी दररोज बक्षीस देण्यात येत आहे. लकी ड्राच्या माध्यमातून दररोज मानाच्या पैठणीच्या विजेत्या घोषित करून पैठणी दिली जात आहे. मागील दहा वर्षांची परंपरा असलेल्या हा दांडिया तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वैविध्यपूर्ण गाणी आणि नेटके संयोजन दांडियाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
बॉईज 4 च्या कलाकारांना रावेतच्या दांडियाचा मोह….
नवरात्र उत्सव 2023 निमित्त आयोजित भव्य दांडिया उत्सवाला बॉईज 4 च्या कलाकारांना मोह आवरता आला नाही तेही या दांडिया उत्सवात सहभागी होऊन दांडियाचा आनंद घेतला व त्याला दांडिया प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी बॉईज-4 चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक राजेंद्र शिंदे ,अभिनेता पार्थ भालेराव (ढुंग्या), प्रतिक लाड (धैर्या), अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री रितिका श्रोत्री, ऋतुजा शिंदे व हास्य जत्रा मधील कलाकार गौरव मोरे आणि निखिल बने व अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली.
अनेक मान्यवरांच्या भेटी
नवरात्र उत्सव 2023 च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रास दांडिया मोहत्सवाला पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक मयूर कलाटे,संत तुकाराम सह साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, उद्योजक राजकुमार कोंडे,कामगार नेते हेमंत कोयते,उद्योजक किरण घोडके,शुभम वाल्हेकर,निलेश वाल्हेकर,वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे,पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या दररोज भेटी देत आहेत.
सीटीव्हीची नजर
सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दांडियासाठी पोलिस यंत्रणेकडून वेळ देण्यात आला असल्याने वेळेत सर्व उपक्रम पूर्ण करण्याकडे मंडळाचे पदाधिकारी लक्ष देत आहेत. मंडळांने दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. काही गरबा समूहांकडून खास फोटोसेशन करून घेतले जात असून काही युवावर्ग या रासगरबा समोर आपला सेल्फी घेत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील बारा वर्षांपासून दांडिया स्पर्धेचे मी आयोजन करीत असून प्रत्येक वर्षी सहभागी स्पर्धकांची संख्या वाढत आहे.महिला आणि तरुणी यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने येथे चोख बंदोबस्त असतो.स्पर्धे पूर्वी १५ दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते या प्रशिक्षणाचा फायदा परिसरातील अनेक तरुण तरुणींना होत आहे.- मोरेश्वर भोंडवे,मा.नगरसेवक