वडगाव,दि.12 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ पंचायत समिती सभागृहात विकासकामे आढावा बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.९) संपन्न झाली.बांधकाम,पाणीपुरवठा,आरोग्य इ. विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मावळ तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध आहे,अनेक कामे मंजूर आहेत. या कामांपैकी काही कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.परंतु सरासरी 60 टक्के कामे अजूनही अधांतरीच आहेत. सर्वसामान्यांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध असूनही कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गतीने काम करण्याची गरज आहे असे आमदार शेळके म्हणाले.
• स्मशानभूमीसाठी गायरान जागा असल्याचे कारणामुळे अनेक गावातील स्मशानभूमीची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर योग्य पाठपुरावा करणे गरजेचे असून यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.
• घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध होत नसल्यामुळे वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी कुठे जागा उपलब्ध होईल यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधायला हवा. प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
• तालुक्यात सुमारे 25 पेक्षा अधिक ठिकाणी अंगणवाड्यांची दुरावस्था झाली आहे.त्याठिकाणी चांगल्या दर्जाच्या अंगणवाड्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे.त्यासाठी निधीची तरतूद पाहून लवकरात लवकर ही कामे हाती घ्यावी.
• जल जीवन मिशन अंतर्गत अजूनही 53 गावांचा आराखडा सादर करण्यात आला नाही.त्यासाठी संबंधित अधिकारी यांनी लवकर पावले उचलावीत.
• दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत.परंतु त्यासाठी या निधीचा हवा तेवढा विनीयोग केलेला नाही. या योजना प्रभावीपणे राबवून योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी जनजागृती करावी व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून द्यावा.
•ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी ‘आपलं मावळ स्वच्छ मावळ’ अशी एखादी मोहीम राबवून त्यात नागरिकांना देखील सहभागी करून घ्यावे.
• महिलांचे बचत गट करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना आहेत.परंतु त्यासाठी गावपातळीवर काम करावे.ग्रामसंघ स्थापन केले पाहिजे, त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.
कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे.अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच काही कामांसाठीची डेडलाईन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, तहसीलदार मा.मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी मा.सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी मा.चंद्रकांत लोहारे, पंचायत समिती सभापती मा.ज्योतीताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या मा.अलकाताई धानिवले, पंचायत समिती सदस्य मा.साहेबराव कारके, मा.निकिताताई घोटकुले, तसेच सर्व विभागाचे अधिकारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.