पिंपरी, दि. ०१ ऑगस्ट २०२१ :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे मोकळ्या ठिकाणी न करता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून हे कार्यक्रम शहरातील नागरिकांनी घरबसल्या पहावेत आणि कोरोना प्रसाराला प्रतिबंध करावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत विविध विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये व्याख्यान, परिसंवाद, महाचर्चा, शाहीरी कार्यक्रम, लोकगीते या सारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहे याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर माई ढोरे यांनी माहिती दिली.
१ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यालय येथे सकाळी १०.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन पध्दतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. यानंतर शाहीर बापू पवार हे जल्लोष लोकशाहीराचा हा कार्यक्रम सादर करणार आहे तर पल्लवी घोडे या संगीत संध्या हा कार्यक्रम तर रंजित खंडागळे शाहीरी अण्णांची हा कार्यक्रम सादर करतील. महादेव खंडागळे हे जागर रयतेच्या राजाचा हा गीतांचा कार्यक्रम तर चंदन कांबळे सायंकाळी ७ वाजता हे कव्वाली सादर करणार आहेत.
२ ऑगस्ट रोजी शाहीरी जलसा हा कार्यक्रम धनंजय खुडे हे तर राहुल शिंदे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीते सादर करणार आहेत. नितीन गांढुळ हे तरंग सप्तसुरांचा हा कार्यक्रम सादर करणार आहेत तर लखन अडागळे पठ्ठा लहुजींचा हा कार्यक्रम सादर करतील. यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वैचारीक विश्लेषण या विषयावर सायंकाळी ६ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये डॉ. देविदास वायदंडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अभिनेते राहुल सोलापूरकर, डॉ. धनंजय भिसे, डॉ. सुभाष खिलारे सहभागी होणार असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी साळवे तर सुत्रसंचालन अनिल गायकवाड हे करणार आहेत. यानंतर संगीत रजनी सारेगमप हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता विजय उलपे सादर करणार आहेत.
३ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारीत क्रांतीकारी गीते निलेश देवकुळे सादर करणार आहेत तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वंचितांची दखल पात्रता या विषयावर दुपारी १२ वाजता परिसंवाद होणार आहे त्यामध्ये पदमश्री गिरीश प्रभुणे, दादा इदाते, केंद्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जमाती आयोग भारत सरकार, नवी दिल्ली प्रदीप निफाडकर, अविनाश बागवे, माजी मंत्री, नगरसेवक पुणे महानगरपालिका सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन घोलप तर सुत्रसंचालन अरुण जोगदंड हे करणार आहेत.
४ ऑगस्ट रोजी सुमेध सुमेध कल्हाळीकर लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारीत गीते सादर करणार आहेत तर दुपारी १२.३० वाजता प्रभाकर पवार फकीरा हे नाटक जग बदल घालुनी घाव सादर करणार आहेत. साजन बेंद्रे लोकगीते सादर करणार असून अनुसूचित जातीचे वर्गीकरण, आरक्षणाचे समनिहाय वितरण व अनुसूचित जातीवर होणारे हल्ले आणि उपाययोजना या विषयावर सायंकाळी ४ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ओ.पी.शुक्ला, अध्यक्ष राष्ट्रीय दलित बचाव आंदोलन, भगवानराव वैराट, डॉ. पी. डी. साबळे, डेक्कन कॉलेज, डॉ. अंबादास सगट, औरंगाबाद सहभागी होणार असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज तोरडमल तर सुत्रसंचालक नाना कसबे करणार आहेत. यानंतर सायंकाळी ५ वाजता सारिका गायकवाड प्रबोधनपर गीते तर रेश्मा सोनवणे सायंकाळी ७ वाजता लोकगीते सादर करतील.
५ ऑगस्ट रोजी राजू जाधव हे लोकगीते सादर करणार आहेत आणि तर नवे शैक्षणिक धोरण आणि वंचितांच्या संधी या विषयावर दुपारी १२.३० वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये डॉ. रमेश लांडगे, प्रभात केसरी, प्रा. कालिका कॉलेज बीड, प्राचार्य प्रदीप कदम, गणेश ठोकळ सर, प्रा. काशिनाथ अल्हाट, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव सहभागी होणार असून प्रास्ताविक भाऊसाहेब अडागळे तर सुत्रसंचालन संजय ससाणे करणार आहेत. यानंतर विकास येडके हे शाहीरी व पोवाडे सादर करणार आहेत तर सुनिल भिसे हे मी अण्णा भाऊ बोलतोय या विषयावर एकांकिका सादर करणार असून त्याचे प्रास्ताविक संदीपान झोंबाडे करतील. संकल्प गोळे हे लोकगीते सादर करणार असून यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता सायंकाळी ७ वाजता जयेंद्रु मातोश्री प्रॉडक्शनच्या लोकगीताने होणार आहे.
वरीलप्रमाणे ५ दिवसाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या www.facebook.com/pcmcindia.gov.in या अधिकृत फेसबुक पेज आणि pcmcindia या युट्यूब चॅनेलवर प्रसारीत करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर माई ढोरे तसेच सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.