मुंबई, दि.२३ जानेवारी २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याचे शिल्पकार शशिकांत वडके, वास्तुविशारद रोहन चव्हाण, सल्लागार भुपाल रामनाथकर, अभियंता प्रदीप ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस आहे. हा कायम लक्षात राहण्यासारखा क्षण आहे. शिवसेनाप्रमुख मोठे मार्गदर्शक होते. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन कायम दिशादर्शक ठरणार आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत ऋणानुबंध होते. आज या समारंभासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले, त्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. पुतळा ९ फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे. पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आला आहे.