मोशी,दि.14 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करावी अन्यथा तिला जिवे मारू, अशा प्रकारची धमकी देणारे मेल मुलीच्या पालकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या मेलवर पाठवण्यात आले आहेत. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोशी येथील एका ४२ वर्षीय महिलेने याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ जून ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत मोशी येथे घडला आहे. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीच्या झूम अॅपवर, तिच्या वडिलांच्या ईमेलवर आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ईमेलवर अश्लील मेसेज पाठवून अज्ञाताने मुलीचा विनयभंग केला.अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार शहरात घडला असून यामुळे पालकवर्गासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.