सासवड,दि.05 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा ठराव केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथे घडली. जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी करण्यात आली. ती न दिल्यास जात पंचायतीने कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठात सुरेश रत्न बिनवात (रा.सत्वनगर, महंमदवाडी), सप्त पन्नालाल बिनवात (रा. सत्वनगर), नंदू आत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्याजवळ), मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर), देविदास राजू चव्हाण (रा. नऱ्हे गाव), देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.सुहानी ऊर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनवात व मुन्ना बिनवात व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्याची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील १२ गावचे पदाधिकारी, १२ जातीचे सर्व पाहुणे मित्र मंडळी यांना गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रिटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी १ वर्षासाठी बहिष्कृत केले तसेच त्यांना दंड ठोठावला. तसा व्हिडीओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
Home ताज्या बातम्या धक्कादायक प्रकार- जात पंचायतीने एका कुटुंबाला समाजातून एक वर्षासाठी केले बहिष्कृत