संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात मौलाना व ट्रस्टी यांची उपस्थितीत चर्चा
पिंपरी,दि.२९ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी – प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज) :- संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीतील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ९ मस्जिदींचे मौलाना व ट्रस्टी यांची विशेष बैठक आयोजित केली.
ही बैठक १७.१५ वाजता पार पडली. यावेळी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त मा. श्री. संदीप आटोळे तसेच पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मा. श्री. सचिन हिरे यांनी मार्गदर्शन केले. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याही बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत सर्व धार्मिक सण उत्साहात, परंतु कायद्याच्या चौकटीत पार पाडावेत, याबाबत पोलिसांनी मौलाना व ट्रस्टींना आवाहन केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त गोष्टी टाळून सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी लोकशाही युवा फाउंडेशनचे शहाबुद्दीन मौलाली शेख यांनी पैगंबर जयंती निमित्त डीजे वाजवण्यास परवानगी देऊ नये, याबाबत निवेदन पोलिसांना दिले.
पोलिस प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेतली जाईल, तसेच योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.





