वडगाव मावळ,दि.१५ ऑगस्ट २०२५ ( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी): – तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी बापस रोडवरील जय मल्हार हॉटेलमध्ये २६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडलेल्या खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचा जामीन अर्ज वडगाव मावळ येथील अॅडिशनल सेशन कोर्टाने नामंजूर केला आहे.
ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असून, आरोपी अक्षय दत्तात्रय येवले (आरोपी क्र. १) व अभिषेक बाबाजी येवले (आरोपी क्र. २) यांनी कोयत्याने वार करून प्रसाद उर्फ किरण अशोक पवार यांचा जागीच खून केला होता. यावेळी उपस्थित असलेल्या अभिषेक अशोक येवले या साक्षीदारालाही गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी मयताचे वडील अशोक निवृत्ती पवार यांनी २७ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर आरोपी अक्षय येवले याला २७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यास पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अभिषेक येवले यास ८ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली व त्यालाही पुढे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
जामिनासाठी केलेला प्रयत्न फसला
दोन्ही आरोपींच्या वतीने नामवंत वकिलामार्फत २४ एप्रिल २०२५ रोजी जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.अँड यांनी कोर्टात सरकारी वकिलाना सशक्त युक्तिवाद करण्यास महत्वाचे मुद्दे उपस्थित करून सहकार्य केले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक वकील अॅड. श्रीकांत सावंत व अॅड. अविनाश शिंदे यांनी कोर्टात सशक्त युक्तिवाद सादर केला. त्यांनी आरोपीचा गुन्ह्यातील प्रथम दर्शनी सहभाग, घटनास्थळी मिळालेली हत्यारे, सीडीआर रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आदींचा उल्लेख करत आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदार व फिर्यादीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली.
त्याचवेळी आरोपींच्या वतीने त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे, आरोपी क्र. २ घटनास्थळी नव्हता, साक्षीदार अनेक व्यक्तींना गोवतो आहे, तसेच आरोपीच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे त्याला जामिनावर सोडावे अशी बाजू मांडण्यात आली.
कोर्टाचा निर्णायक निर्णय
दि. ७ जुलै २०२५ रोजी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, सादर केलेले पुरावे व तपास अहवाल लक्षात घेऊन आरोपींचा प्रथम दर्शनी सहभाग असल्याचे मान्य केले. परिणामी, ३० जुलै २०२५ रोजी आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.
त्यामुळे आरोपी क्र. १ आणि आरोपी क्र. २ हे अनुक्रमे २७ नोव्हेंबर २०२४ व ८ डिसेंबर २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.





