
चिंचवड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड परिसरात पती-पत्नीमधील वादाने भीषण रूप घेतलं असून, चारित्र्याच्या संशयातून पत्नीनं पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव नकुल भोईर तर आरोपी पत्नीचे नाव चैताली भोईर असे असून, या घटनेने चिंचवड शहर हादरले आहे.ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास लिंक रोडवरील माणिक कॉलनी येथील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या इमारतीत घडली.
मृत व्यक्तीचे नाव नकुल आनंद भोसले (वय ४०) असे असून, त्यांची पत्नी चेताली भोसले (वय २९) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
🔹 घटनेचा तपशील
चिंचवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून नकुल भोसले हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुन्हा वाद झाला आणि तो विकोपाला गेला. त्यातून संतापलेल्या चेतालीने लांब कपड्याने नकुल यांचा गळा आवळला, यात त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर चेतालीने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नकुल मृत अवस्थेत आणि चेताली त्यांच्याजवळ बसलेली आढळली. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले.
🔹 समाजसेवक आणि सर्पमित्र म्हणून ओळख
नकुल भोसले हे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा यांसारख्या संघटनांमध्ये सक्रिय होते. ते सर्पमित्र म्हणूनही ओळखले जात होते.
विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमी अग्रेसर होते आणि परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क होता.
🔹 राजकीय स्वप्न भंगले
आगामी महापालिका निवडणुकीत चेतालीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी नकुल प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांशी संपर्क साधला होता. मात्र, या घटनेने त्यांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे.
या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले असून, या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
🔹 पोलिसांचा पुढील तपास सुरू
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चेतालीला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.चिंचवड पोलिस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.






