देहुरोड,दि.११ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड परिसरात पुन्हा एकदा टोळीमारहाणीचा प्रकार घडला असून, हाऊसकिपिंग कामगार आणि त्याच्या कुटुंबावर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजता कणसे हॉस्पिटलच्या पाठीमागे सुपर दुर्गा मार्केट जवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, राकेशकुमार बलवीर कल्याण (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते मूळचे हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील सोपडा गावचे रहिवासी आहेत. सध्या ते बापदेवनगर, देहुरोड येथे पत्नी व पुतण्यांसोबत राहत आहेत.
फिर्यादींचे पूर्वी आरोपींसोबत किरकोळ भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपींनी पुन्हा फिर्यादीच्या घरावर चढाई करत लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि दगडफेक केली. या हल्ल्यात फिर्यादीचा पुतण्या दिपक कल्याण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१️) सुर्या मुर्गन (वय २०)
२️) आकाश मुर्गन (वय २१)
३️)अजितकुमार राजकुमार कल्लीमुर्ती (वय २१)
४️) अजित मायाकृष्ण स्वामी (वय २२)
सर्व आरोपी एम.बी. कॅम्प, देहुरोड येथील रहिवासी असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५), ११५(२), १२५(अ), ३५२, ३५१(१) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
तपास पोहवा ठोकळे हे करीत असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
📰 “प्रजेचा विकास” निरीक्षण:
देहुरोड परिसरात वाढत्या मारहाणीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई करून परिसरात कायद्याचे वर्चस्व राखणे आवश्यक आहे.



