तळेगाव दाभाडे, ११ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा फक्त महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनाच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार सर्व निष्ठावान कार्यकर्ते अहोरात्र प्रचार करून शेळके यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील, असा निर्धार भाजपचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी आज (रविवारी) व्यक्त केला.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात नारळ वाढून करण्यात आला. त्यावेळी जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर संतोष दाभाडे बोलत होते. दबावाला झुगारून भाजपचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते उघडपणे शेळके यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे आज पाहायला मिळाले.
त्यावेळी श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, भाजप नेते व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख डेबू खरटमल, रिपब्लिकन पक्षाचे संदीप शिंदे तसेच शोभाताई भेगडे, रजनी ठाकूर, शैलजा काळोखे, सुरेश दाभाडे, दिलीप खळदे, बाबुलाल नालबंद, दौलत भेगडे, शबनम खान, संगीता शेळके, साहेबराव दाभाडे, संकेत खळदे, मयूर तथा बंटी टकले, विशाल दाभाडे, महेश रघुवंशी, ज्योतीताई शेळके तसेच अनेक आजी-माजी नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा या पक्षांनी अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिल्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या नावावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यू-टर्न घेतला असून सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून आता भाजपचे पक्षनिष्ठ नेते व कार्यकर्ते उघडपणे आमदार शेळके यांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत.
संतोष दाभाडे म्हणाले की, भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती केली आहे. त्यानंतर सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी वाटलं की सगळे मिळून महायुती धर्माचे पालन करून पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. काही कार्यकर्ते इकडे आहेत तर काही कार्यकर्ते तिकडे आहेत. पण भाजप हा शिस्तीचा व निष्ठेचा पक्ष आहे. एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करावाच लागतो.
आमच्यावर जयवंतराव दाभाडे, नथुभाऊ भेगडे, केशवराव वाडेकर, बाळासाहेब जांभूळकर यांचे संस्कार आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही वाटचाल करतो, असे संतोष दाभाडे म्हणाले.
सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत. आमदार शेळके यांनी मुलांचे शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, मोफत वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलच्या बिलांमध्ये सूट, नोकरी, व्यवसायासाठी मदत अशी लोकांची कितीतरी वैयक्तिक कामे करून मदत केली आहे, याची संतोष दाभाडे यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.
‘वरून पिपाणी, आतून तुतारी’
बापूसाहेब भेगडे यांची प्रतिमा ‘सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार’ म्हणून उभी करण्यात येत असून त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळाले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा यांनी अधिकृत पाठिंबा दिल्यामुळे ते महाविकास आघाडीचेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरून पिपाणी आणि आतून तुतारी, अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते कधीही तुतारीचा प्रचार करणार नाहीत, असे संतोष दाभाडे म्हणाले.
‘आधी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र दाखवा’
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पाठिंबाची पत्रके भाजपचे नेते गोळा करीत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. इतर पक्षांची पत्रे गोळा करण्याआधी त्यांनी भाजपच्या पाठिंबाचे पत्र दाखवावे, असा जबरदस्त टोला संतोष दाभाडे यांनी लगावला. भाजपचा झेंडा नाही, भाजपच्या नेत्यांचे फोटो नाही, मग हा कसला ‘सर्वपक्षीय’ उमेदवार, असा शेरा देखील त्यांनी मारला.