भोसरी,दि.२२ जुलै २०२४ :(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, भोसरी येथे दि. २१ जुलै २०२४, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत युवकांसाठी आयोजित विशाल आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, आव्हाळवाडी येथील हजारोंच्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक विचारधारा जगातील जवळजवळ ६० पेक्षा अधिक देशामध्ये पोहोचली आहे. मिशनची ही प्रेमाची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यासाठी भाषेचा अडथळा होऊ नये यासाठी वैश्विक भाषा इंग्लिशच्या माध्यमातून सत्संगचे आयोजन मिशनच्या सर्व शाखांमध्ये करण्यात येते. युवा वर्गाला इंग्रजीमधून आपल्या आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण करण्याची सवय लागावी हा या संत समागमाचा उद्देश होता.
या विशाल सत्संग सोहळ्याच्या मुख्य मंचावरून श्री शिवदास सिंह जी (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले. मनुष्याला आपल्या जीवनामध्ये मिळणारा आनंद हा इतर कोणावर अवलंबून नसून स्वतःवर अवलंबून आहे . सुखी-समाधानी जीवन जगायचे असेल तर ती त्याची स्वतःची जबाबदारी आहे, त्या साठी तो दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही.मनुष्य आज अस्थिर गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या विश्वामध्ये केवळ परमात्मा स्थिर आहे बाकी इतर सर्व वस्तू नाश होणाऱ्या आहेत . जर मनुष्याने स्थिर परमात्म्याशी आपले नाते जोडून याचा आधार आपल्या जीवनामध्ये घेतला तर मान -अपमान ,शब्द-अपशब्द ,यश- अपयश यांचा कोणताही प्रभाव आपल्यावर पडणार नाही. जेव्हा बाहेरील कोणतीही वस्तू,व्यक्ती किंवा क्रिया आपल्या अंतर्मनातील शांती भंग करण्यात असमर्थ ठरते तेव्हा जीवन एक आनंद आहे. अशा आशयाचे उद्गार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
या विशाल सत्संगामध्ये अनेक युवकांनी इंगजी भाषेचा आधार घेऊन गीत, अभंग, विचार तसेच आध्यात्मिक प्रदर्शनी च्या माध्यमातून संत निरंकारी मिशन ची मूल्ये सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पठारे आणि योगेश पंद्री यांनी केले. कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी, भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी केले.
Home ताज्या बातम्या संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश मेडीयम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न..