पिंपरी,दि. ४ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात सर्वत्र पिंगळा, गोंधळी, वासूदेव आदी पारंपरिक लोक कलावंतांकडून नाट्य संमेलनाचे निमंत्रण देत देऊन प्रचार करण्यात येत आहे. पहाटेच्या वेळी वासुदेव लोकवस्तीत जाऊन सर्वसामान्य नागरिकांना नाट्य संमेलनासाठी आमंत्रित करत आहेत. त्यामुळे उद्योग नगरी ही सांस्कृतिक वातावरणात न्हावून निघाली आहे.
“ऐका दादा वहीनी ऐका दादा वहीनी
तुम्ही यायच जोडीणी
पाहू नाट्य संमेलन विसरु नका कोणी ll
कलावंतांचा फ़ुलणार मळा
तिथं साऱ्यांनी व्हायचं गोळा
आहे आनंदाचा हा सोहळा
जीवन जगण्याची जणू ही शाळा
सहा तारीक सात तारीक
नव्या वर्षाची पर्वणी
पाहू नाट्य संमेलन विसरु नका कोणी”
असे प्रचार गीत गाऊन हे लोककलावंत नांगरिकांपर्यंत नाट्य संमेलन पोहचवत आहेत. नागरिक नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्या या संकल्पनेचे कौतुक करत आहेत.
या विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, काळाच्या पडद्याआड लोप पावत चाललेली जी लोककला आहे. ती पुन्हा लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने आम्ही या १०० व्या नाट्य संमेलनाच्या प्रचारासाठी या लोककलांना निमंत्रित केले आहे. यामुळे लोपपावत चाललेली लोककला देखील आम्ही नाट्य रासिकांपर्यंत पोहचवू शकलो. भारुडी, पिंगळा, गोंधळी, वासूदेव, भिल्ल, डोंबारी, धनगर असे अस्सल लोककलवंत निलंगा, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला या भागातून आलेले आहेत. सर्व घटकांना सामावून घेवून हा नाट्य संमेलनाचा सोहळा साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.