पिंपरी,दि.४ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुला मध्ये ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाची तयारी पूर्ण झाली आहे. तर भोईर नगर येथील बालनाट्य नगरी देखील नाट्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय नाट्य संमेलनाचे कार्यक्रम व नाटकं ज्या पाच नाट्यगृहात होणार आहेत; ती नाट्यगृह देखील रंगबिरंगी विद्युत रोषणाईने सजली आहेत. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये १०० व्या नाट्य संमेलनाचे पडघम वाजू लागल्याचे चित्र आहे असे नाट्य संमेलनाचे आयोजक,नाटय परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
मुख्य सभा मंडप आणि पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह,चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह १ व २ या पाच ठिकाणी उदघाटन सोहळ्या दरम्यान तब्बल ६४ वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही सर्व नाट्यगृह आता रंगबिरंगी विद्युत् रोषणाईने सजली असून नाट्यगृहांचा परिसर व उद्योग नगरीचे रस्ते देखील सांस्कृतिक वातावरणात उजळून निघाले आहेत.