प्रशासन चुकीचे धोरण राबवत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने डीपीआर होईपर्यंत एकही दुकान हटवू देणार नाही. स्थानिक आणि येथील व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही. महापालिकेने चुकीची कारवाई करून गोर-गरिबांची रोजी-रोटी हिरावून घेऊ नये. अन्यथा कारवाई केल्यास तीव्र परिणांमाना सामोरे जावे लागेल.- मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक
पिंपरी, दि.०५ मे २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुनावळे ते मुकाई चौक बीआरटी रस्त्या लगत शेतकऱ्यांच्या जागेवर बांधकाम करून व्यावसायिकांनी विविध दुकाने थाटली आहेत. बीआरटी रस्त्याच्या डीपीआर हा 30 मीटर रस्त्याचा आहे. 30 मीटर डीपीआरच्या आरक्षित जागेवर एकही अतिक्रमण नाही. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेवर ही दुकाने आहेत.जरी ही दुकाने अधिकृत परवानगी घेऊन बांधली नसली तरी हि उपजिवीकेचे साधन म्हणुन त्यांची या दुकानामुळे रोजीरोटी सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला येथील दुकानांवर चुकीची कारवाई करू देणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिला आहे.शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या बांधकामांवरील कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, पुनावळे, मुकाई चौक बीआरटी रस्त्यावरील बांधकामांवर कारवाई करण्यास माजी नगरसेवक भोंडवे यांनी तीव्र विरोध केला आहे.
याबाबत माजी नगरसेवक भोंडवे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे, मुकाई चौक बीआरटी रस्त्याच्या डीपीआर हा 30 मीटर रस्त्याचा आहे. 30 मीटर डीपीआरच्या आरक्षित जागेवर एकही अतिक्रमण नाही. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेवर ही दुकाने आहेत. ही दुकाने अधिकृत परवानगी घेऊन बांधली नसली तरी त्यांची या दुकानामुळे रोजीरोटी सुरू आहे. महापालिकेच्या एका फुटाच्या जागेवरही अतिक्रमण नाही. त्यामुळे होणारी ही कारवाई चुकीची आहे. ही बांधकामे हटवायची असल्यास 30 मीटर ऐवजी 45 मीटरचा डीपीआर तयार करावा. त्यावर आरक्षण टाकावे. महापालिकेने जागा ताब्यात घ्यावी. त्याचा मोबादला शेतकऱ्यांना द्यावा. ही जागा ताब्यात घ्यावी, त्यानंतर आम्ही स्वतः हून बांधकामे हटविण्यास तयार आहोत. परंतू, बेकायदेशीर आणि चुकीची कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक भोंडवे यांनी दिला आहे.