पिंपरी,दि. ३० जानेवारी २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ज्या प्रमाणे स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांची जुलमी सत्ता घालविण्यासाठी चले जाव चा नारा देण्यात आला. त्या प्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशातील भाजपची हुकूमशाही सत्ता घालविण्यासाठी सर्व देशवासियांनी आता भाजपा चले जाव चा नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. २६ जानेवारी) खराळवाडी पिंपरी येथे डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सामुहिकरित्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. डॉ. कैलास कदम, कविचंद भाट, नरेंद्र बनसोडे, सायली नढे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा रायली नढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नेते राजाभाऊ भोंडवे, हिरा जाधव, सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, तानाजी काटे, डॉ. सुनिता फुलावरे, दिनकर भालेकर, माऊली मलशेट्टी, आबा खराडे, प्रा. किरण खाजेकर, इस्माइल संगम, तारीक अख्तर, किरण नढे, स्वाती शिंदे, राणी राठोड, रोहित भाट, सौरभ शिंदे, रोहित तिकोणे, पांडूरंग जगताप, सारीका शिंदे, शरद पुलावळे, अनिता डोळस, कोमल पाईकराव, अनिता अधिकारी, उषा साळवे, ललीत थोरात, सीमा गायकवाड, अकबर शेख, आनंद फडतरे, चंद्रशेखर हुंशाळ, विजय ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, स्वप्निल बनसोडे आदी उपस्थित होते.
डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस पक्षाचे महत्वपुर्ण योगदान आहे. १८५७ साली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. या लढ्यात हुतात्मा सुखदेव, भगतसिंगसह पिंपरी चिंचवड मधील चापेकर बंधू तसेच हुतात्मा राजगुरु, दाभाडे, बाबू गेनू तसेच हेमू कलाणी यांचे बलिदान अमुल्य आहे. अशा हजारो हुतात्मांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीने दिलेल्या घटनेवर राष्ट्रपतींनी मोहर उमटविली आणि भारत देश प्रजासत्ताक झाला. आज जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. संविधानामुळे मिळालेली ही लोकशाही भाजपाच्या सत्तेमुळे धोक्यात येत आहे. भारतीय लोकशाही वृध्दीगंत होण्यासाठी आणि चिरंतन टिकविण्यासाठी केंद्रातील भाजपाची हुकूमशाही सत्ता घालविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व देशवासियांनी आता ‘भाजपा चले जाव’ चा नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच आपल्या भावी पिढांचे भविष्य सुरक्षित राहिल असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.