Home ताज्या बातम्या गणेशोत्सव काळात मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी – परिवहन मंत्री...

गणेशोत्सव काळात मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी – परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

50
0

मुंबई,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)  :- गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी या काळात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

मंत्री श्री.रावते म्हणाले की, गणेशोत्सव काळात मुंबई परिसरातून कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या काळात एसटी महामंडळानेही कोकणातील विविध भागात जाण्यासाठी अधिक बसेसची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांचा हा प्रवास वाहतुकीच्या कोंडीशिवाय सुखकर आणि सुरक्षित होण्याच्या दृष्टीने या काळात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात येत आहे. मात्र ही निर्बंधबंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सीजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसेल. महामार्गाच्या रुंदीकरण तथा रस्ता दुरुस्तीच्या कामकाजाचे साहित्य, माल इत्यादीची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू नसेल. तथापी, या वाहतुकदारांनी संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच भारत सरकारच्या रासायनिक खते मंत्रालयाद्वारा जयगड पोर्ट येथे आयात केलेल्या युरीयाच्या सुरळीत पुरवठ्याकरीता महामार्गावरील निवळी ते हातखंबा दरम्यानच्या युरीया खत वाहून नेणाऱ्या वाहनांनाही वाहतूक बंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना रा. म. क्रमांक १७) वर दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्रौ ८ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्रौ ८ वाजेपर्यंत तसेच १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कालावधीत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

तसेच ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर व ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांना सकाळी ८ वाजेपासून रात्रौ ८ वाजेपर्यंत वाहतुकीस पूर्णत: बंदी राहील. या कालावधीत नमूद वाहनांना रात्रौ ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील.

३० ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्रौ ८ वाजेपर्यंत महामार्गावर वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.

Previous articleपुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने घेतली माहिती
Next articleकोराडी नवरात्र उत्सवानिमित्त सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्या – चंद्रशेखर बावनकुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − seven =