Home लेख आंबेडकप्रणीत नवयानाची चीनी अंमलबजावणी

आंबेडकप्रणीत नवयानाची चीनी अंमलबजावणी

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धर्मांतर का केले ? बाबासाहेबांनी अपेक्षित केलेली उद्दिष्ट्ये धर्मांतरानंतर साध्य झाली किंवा नाही? यावर बरेच काही लिहून झाले आहे. असे लेखन करणारांपैकी आंबेडकरवाद्यांचा दृष्टीकोण अभिनिवेषाचा आणि स्वस्तुतीचा असल्याचे दिसते. या स्वस्तुती आणि अभिनिवेषी वृत्तीमुळे आंबेडकरवादी लोक बौद्ध धम्माला, एका संस्थात्मक धर्माचे स्वरूप देण्याचे उपद्व्याप करीत असतात. तर दुसरीकडे समाजवादी, पुरोगामी कम्युनिष्ट बाबासाहेबांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. बौद्ध धर्मात धर्मांतर करणे ही बाबासाहेबांची मोठी चूक ठरविण्याचे भारतीय कम्युनिस्टांचे उपद्व्याप धर्मांतराच्या घोषणेपासून ते आजपर्यंत सुरु आहेत. त्यांच्या मतानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामागे अस्पृश्यता संपविणे हा उद्देश होता. तसेच, अस्पृश्यांमागे दुसऱ्या धर्माचा सपोर्ट उभा करणे ही स्ट्रॅटेजी होती. मात्र यापैकी काहीही साध्य झाले नाही. बाबासाहेब आज जिवंत असते तर त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार केला असता, आणि स्ट्रॅटेजी चुकली असं लक्षात आलं असतं तर तो बदलला असता कारण वैचारिक सातत्य त्यांना गाढवपणाचे लक्षण वाटत होते, अशीही मांडणी अनेक कम्युनिस्ट करतात. या मांडणीचा रोख बाबासाहेबांनी धर्म झुगारून देऊन निधर्मी / नास्तिक झाले असते असे दाखविण्याचा असतो. मात्र आजघडीला कम्युनिस्ट सरकार जेथे अस्तित्वात आहे अशा पाच देशांपैकी सर्वात प्रभावशाली देश असलेल्या चीनमध्ये निधर्मीवाद आणि नास्तिकतेला धिक्कारून बौद्ध धम्माला जनमानसात रुजविण्याचे लक्षणीय प्रयत्न सुरु आहेत. चीनी सरकार केवळ देशांतर्गतच नव्हे तर आशिया पॅसिफिक प्रदेशात बौद्ध धम्माच्या समान ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. धर्माला अफूची गोळी समजणाऱ्या चीनचा बौद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन कशामुळे बदलतो आहे? कट्टर कम्युनिष्ट देश असलेल्या चीनचा बौद्ध धर्माकडे पाहण्याचा सद्याचा दृष्टीकोन आणि बाबासाहेबांचा बौद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामध्ये काही सारखेपणा आहे का ? हे प्रश्न महत्वाचे ठरतात. या प्रश्नाच्या अनुषंगाने चीनचे आताचे राष्ट्रप्रमुख क्झी जिनपिंग यांचा बौद्ध धम्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन तपासला तर तो बऱ्याच प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोनाशी मिळताजुळता आहे असे दिसून येते. भारतातील कम्युनिस्ट विचारांच्या अभ्यासकांनी ही बाब खासकरून समजून घेतली पाहिजे.

क्रांती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा क्रांती घडवून आणली की,पुढे काहीही न करता आवश्यक ते सर्व बदल आपोआप घडून येतील असे कधीही शक्य नसते. समाजाचा भौतिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास जसजसा होत जातो तसतसा व्यक्तीच्या मानसिकतेमध्येही बदल होत जातो. समाजाच्या भौतिक,सामाजिक व राजकीय स्थितीमध्ये घडणाऱ्या बदलानुसार त्या समाजाचे घटक असलेल्या व्यक्तीमध्ये होत जाणाऱ्या मानसिक बदलाचे व्यवस्थापन कोणत्या प्रकारे केले पाहिजे याची समज क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्याना असेल तर क्रांती अधिकाधिक विकसित होते, निर्धारित केलेली उद्दिष्ट्ये प्राप्त करते व नव्या आव्हानांना तोंड देऊन विकास पावते. रशियन क्रांतीच्या नेतृत्वाने व्यक्तीमध्ये होत जाणाऱ्या मानसिक बदलाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवी मूल्यव्यवस्था स्वीकारणारा माणूस तयार करण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही हा डॉ. आंबेडकरांचा रशियन क्रांतीबाबतचा मुख्य आक्षेप होता. समाजाच्या भौतिक,सामाजिक व राजकीय स्थितीमध्ये होणाऱ्या बदलानुसार व्यक्तीमध्ये होत जाणाऱ्या मानसिक बदलाचे व्यवस्थापन केवळ धर्मच करू शकतो हे डॉ. आंबेडकरांचे मत होते. रशियातील कम्युनिष्ट राज्यकर्त्यांनी मार्क्स-लेनिनच्या विचारांना अनुसरून धर्माला अफूची गोळी आणि क्रांतीच्या मार्गातील अडसर ठरविले. यामुळे रशियन समाजाचा नैतिक पाया ढासळला. रशियन क्रांतीच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्हनी बळाचा आधार काढून घेऊन खुलेपणा आणण्याचा प्रयत्न केल्याबरोबर रशियन समाजात अराजकता माजून रशियन कम्युनिष्ट राजवट नष्ट झाली. रशियन राज्यकर्त्यांनी बळाचा आधार काढून घेतल्यानंतर रशियन राज्यक्रांतीची फलश्रुती काय होईल याचे भाकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काठमांडू येथील ‘ बुद्ध की कार्ल मार्क्स ‘ या जगप्रसिद्ध भाषणात १९५६ सालीच स्पष्ट केले होते. चीनच्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी रशियन राज्यक्रांतीच्या पतनापासून बोध घेऊन मार्क्स-माओच्या विचारांच्या पुढे जाऊन समाजाच्या धारणेसाठी धर्माची गरज लक्षात घेतली आहे. विशेष म्हणजे चीनमधील समाजाच्या नैतिक धारणेसाठी सहायक ठरणारा धर्म बौद्ध धर्मच होऊ शकतो या दृष्टीने चीनने बौद्ध धर्माच्या व चीनी बौद्ध संस्कृतीला उत्तेजन देण्याचे धोरण घेतले आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

धर्माकडे पाहण्याचा चीनचा बदलता दृष्टीकोण

चीनी कम्युनिस्ट क्रांतीचे उद्गाते माओ-त्से-तुंग यांच्या मृत्युनंतर चीनी राज्यकर्त्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. चीनच्या धर्माकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचा वेध, पुलित्झर पारितोषिक विजेते पत्रकार इयान जॉन्सन यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘’द सॅाउल्स ऑफ चाईना” या ग्रंथात घेतला आहे. चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली १९४९ मध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट राजवट स्थापित झाल्यानंतर कट्टर कम्युनिस्ट तत्वानुसार राज्यकारभार चालविण्यात आला. धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, खासगी संपत्ती धारण करण्याचा हक्क यावर कडक बंधने लादण्यात आली. उद्योग व शेतीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. कामगार वर्गाची हुकुमशाही पूर्णपणे स्थापन करण्यात आली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे सदस्य असलेल्या कोणालाही कोणत्याही धर्माचे अनुयायी राहता येत नाही. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या कडक धोरणामुळे सुरुवातीची काही वर्षे चीनमध्ये गुन्ह्गारीचे व भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. १९७६ मध्ये माओ-त्से-तुंग यांचा मृत्यू झाला व चीनचे नेतृत्व डेंग झीयाओ पिंग यांच्याकडे आले. डेंग झीयाओ पिंग यांनी १९८२ मध्ये चीनच्या राज्यघटनेत सुधारणा करून सामान्य जनतेला कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी तरतूद केली.चीनच्या आर्थिक धोरणात सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रावरील सरकारी नियंत्रणे उठवून काही प्रमाणात खासगी उद्योग,व्यापार आणि बाजार आधारित अर्थव्यवहार यांना उत्तेजन दिले.डेंग झीयाओ पिंग यांचा हा प्रयोग म्हणजे एकप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या राज्य समाजवादाचा प्रयोगच म्हणावा लागेल. या प्रयोगातून खासगी संपत्ती धारण करणाऱ्या मध्यम वर्गाचा उद्दय झाला. डेंग झीयाओ पिंग यांनी सुरु केलेल्या आर्थिक सुधारणा जिआंग झेमिन व त्यानंतरच्या नेत्यांनी सुरु ठेवल्या, यामुळे आजघडीला चीन जगातील प्रमुख आर्थिक महाशक्ती बनला आहे. चीनमध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे चीनी समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. मात्र या आर्थिक सुबत्तेतून निर्माण झालेल्या चंगळवादी संस्कृतीमुळे चीनी समाजात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय रीतीने वाढले. चीनी सरकारने निधर्मीपणाला उत्तेजन दिल्यामुळे चीनी समाजामध्ये नैतिक मुल्यांचा प्रचंड ऱ्हास झाला. धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने घातल्यामुळे व धर्मस्थळे, धार्मिक संस्था इत्यादी उद्ध्वस्त केल्यामुळे नैतिक मुल्यांचा प्रसार-प्रचार करणारी यंत्रणा नष्ट झाली. याचा परिणाम म्हणून गुन्ह्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. मागील काही वर्षात पैशाचा बेसुमार हव्यास हा चीनच्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चीनी सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालानुसार २००८ ते २०१२ या चार वर्षाच्या कालावधीत १,४३,००० सरकारी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या किंवा कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली शिक्षा देण्यात आली. आजही दररोज जवळपास ९० सरकारी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली जाते. करचुकवेपणा, चोरी, दरोडेखोरी, अन्नभेसळ, व्यावसायिक लबाडी अशा प्रकारच्या गुन्ह्यात चीनमध्ये अलीकडे बरीच वाढ झाली आहे. पैशाचा प्रचंड हव्यास व त्यापायी ढासळलेली सामाजिक नितीमत्ता यामुळे चीनी समाजजीवन अस्थिर आणि संशयी झाले आहे.क्झी जिनपिंग यांच्या विद्यमान राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार कसा रोखायचा हा कळीचा मुद्दा बनला आहे.यासोबतच खाद्यपदार्थातील भेसळ व व्यावसायिक लबाडीच्या गुन्ह्यांना आला घालण्याचे आव्हान चीन सरकारपुढे निर्माण झाले आहे. यामुळे क्झी जिनपिंग यांनी चीनच्या पुरातन सांस्कृतिक श्रद्धास्थाने असलेल्या कन्फ़्युसिअसनिजम, बुद्धीजम, ताओइजम या धार्मिक विचारधारांना मोकळीक देऊन या विचारधारांना युवकांमध्ये लोकप्रिय करण्यास उत्तेजन देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

चीनमध्ये सर्व प्रकारच्या गुन्हेगारीविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे परंतु यामुळे केवळ वरवरचा उपाय होतो सामाजिक प्रवृत्तीमध्ये काहीही सुधारणा होत नाही असे चीनी अभ्यासकांनी विविध अभ्यास अहवालातून दाखवून दिले. सामाजिक नैतिकता सुधारायची असेल तर पारंपारिक तसेच बौद्ध धर्माची सांस्कृतिक परंपरा पुनरुज्जीवित करावी लागेल असे क्झी जिनपिंग यांचे मत असल्याचे निरीक्षण अनेक पाश्चिमात्य अभ्यासकांनी नोंदविले आहे. यानुसार कन्फ़्युसिअसनिजम, बुद्धीजम, ताओइजम या धार्मिक विचारधारांना लोकप्रिय करण्यासाठी सरकारी स्तरावरून ठोस असे प्रयत्न केले जाऊ नयेत, मात्र या धार्मिक प्रवाहांना रोखण्यासाठी पूर्वी ज्याप्रमाणे धार्मिक स्थळांचा विध्वंस करणे, धर्मगुरुंना कैदेत टाकणे, धार्मिक सन-उत्सव करण्यावर बंदी घालणे असे प्रकार अवलंबिले जात होते ते थांबविण्यात यावेत असे धोरण चीनी सरकारने अवलंबिले. चीनमधील एड्सविरोधी कार्यक्रमाचे कार्यकर्ते आणि बौद्धांचे धार्मिक नेते हु जिया यांना धार्मिक कट्टरतेचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली चीनी सरकारने कित्येक वर्षे तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यांची अलीकडेच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बौद्ध धर्मात अकुशल कर्मापासून अलिप्त राहण्याची व कुशल कर्माचे संपादन करण्याची शिकवण दिली जाते. अकुशल कर्माचे फळ वाईट मिळते ही बौद्ध धर्मीयांची शिकवण आहे. म्हणून लोक जर बौद्ध धर्माचे अनुयायी झाले तर चीन मधील गुन्हेगारीला आळा बसेल. ही बाब त्यांनी चीनी अधिकाऱ्यांना वारंवार पटवून दिली. यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेकडून पूर्वी जसा त्रास दिला जात असे तसा आता दिला जात नाही. चीनच्या राज्यघटनेने नागरिकांचा सामान्य धार्मिक जीवन जगण्याचा हक्क मान्य केला आहे. बौध्द, ताओइजम, मुस्लीम व कॅथोलिक धर्माच्या अनुयायांना कायद्याचे पालन करून धार्मिक कार्यकलाप करता येतात. मात्र यावर सरकारची अनेक बंधने होती. बौद्धांपैकीच एक असलेला फालुन गाँग हा धार्मिक पंथ ( Falun Gong ) तिबेटीयन बुद्धीजम (तंत्रयान) यावर चीन सरकारने बंदी घातली आहे.

चीनप्रणीत बौध्द धम्म पुनरुत्थान

क्झी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माप्रती अत्यंत उदार दृष्टीकोन अवलंबिला आहे.
चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचा सदस्य कोणत्याही धर्माचा अनुयायी राहू शकता नाही. यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष क्झी जिनपिंग हे स्वतः बौद्ध धर्माचे अनुयायी नाहीत. मात्र त्यांचा एकूणच कल बौद्ध धर्माकडे झुकलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. ते २००६ मध्ये झेजियांग प्रांताचे प्रमुख असताना त्यांनी वूक्झी शहरात वर्ल्ड बुद्धिष्ट फोरम चे आयोजन करण्यास मोठे सहकार्य केले होते. या परिषदेचे उद्घाटन त्यांनीच केले होते.त्यानंतर २००९ व २००१२ मध्ये चीनची राजधानी बीजिंग शहरात जागतिक बौद्ध फोरमची अधिवेशने चीन सरकारच्या मदतीने चीनमध्येआयोजित करण्यात आली. यामध्ये जगातील ५० देशातील विद्वान बौद्ध धर्मगुरू,अभ्यासक,पंथप्रमुख यांना हजारोंच्या संख्येने चीनमध्ये पाचारण करण्यात आले होते. चीनने २०१४ च्या ‘ वर्ल्ड बुद्धिष्ट फेलोशिप समीट ‘ चे यजमानपद स्वीकारले होते. चीनच्या पुढाकाराने जगातील विविध देशांमध्ये “युएन वेसाक डे” हा बौद्धांचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यासाठी संयक्त राष्ट्रसंघावर दबाव आणला. यातूनच यावर्षी पहिल्यांदाच “युएन वेसाक डे” श्रीलंकेमध्ये साजरा करण्यात आला. चीनतर्फे थेरवादिन व महायानी देशांमध्ये सांस्कृतिक व आर्थिक सहकार्य वाढावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा भाग म्हणून कंबोडियातील ऐतिहासिक बौद्ध मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी चीनने मोठे आर्थिक सहय्य केले. म्यानमार तसेच श्रीलंका, थायलंड येथील जुन्या बौद्ध मंदिरांचे नुतनीकरण करून त्यांना जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी चीन पुढाकार घेत आहे. चीनमधील लिंगशौन शहराला ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन शहराप्रमाणे जगातील बौद्धांचे प्रमुख तीर्थस्थान बनविण्यासाठी चीनने काम सुरु केले आहे.चीनला लागून असलेल्या लदाख, अरुणाचल, मंगोलिया, रशियाचा काही भाग यावर हिमालयन तिबेटी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे.चीन या भागातील जनतेला सांस्कृतिक आधाराने चीनशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.

चीनमध्ये १९६६ ते १९७६ या दरम्यान सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली हजारो प्राचीन बौद्ध मठ, बौद्ध मंदिरे यांची नासधूस करण्यात आली होती. यामुळे चीनमधील बौद्ध धर्म पूर्णतः नष्ट झाल्यागत होता. मात्र आता चीनचे राष्ट्राध्यक्ष क्झी जिनपिंग यांच्याशी अत्यंत जवळीक असलेले महायानी बौद्ध धर्मगुरू जींगझ्योंग यांच्या धार्मिक नेतृत्वाखाली चीनमधील जीर्ण झालेले बौद्ध मठ, जीर्ण झालेली बौद्ध मंदिरे यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. जींगझ्योंग यांच्या शिकवणुकीनुसार लाखो नवश्रीमंत व मध्यमवर्गीय लोक,उद्योजक,विद्यार्थी यापासून ते सामान्य कामकरी लोक धर्माच्या पलीकडे जाऊन बोधिसत्व अमिताभ उपदेश करीत असलेल्या “ यीन गुओ ”( yin guo ) म्हणजेच एकमेकावर अवलंबित क्रिया आणि अस्तित्व या बुद्धाच्या प्रतीत्य सामुत्पादी सिद्धांताच्या आधारे ऐहिक सुख प्राप्त करून जीवनात शांती व समाधान मिळविता येते यावर ठाम आहेत. त्यांचे अनुयायी दिवसेंदिवस वाढत आहेत.बोधिसत्व अमिताभ यांच्या विचारांशी जवळीक साधने हा चीनी लोकजीवनातील नव्याने रूढ ट्रेंड बनतो आहे.

धार्मिकतेचे आधुनिकीकरण

उत्तर आधुनिक ( Post-Modernist ) आणि औद्योगिकीकरणोत्तर ( Post Industrialization ) जगतात निर्माण झालेल्या अतितीव्र तंत्रयुगात (Exponential Techno age ) मानवी समूहातील आपसी संघर्षाचा संघर्षबिंदू आर्थिक विषमता आणि आर्थिक शोषण नसून सांस्कृतिक आचरण भिन्नता किंवा धर्म हा बनू पाहतो आहे. पूर्व युरोपातील पूर्वीचे कम्युनिष्ट देश, मध्यपूर्वेतील इस्लामी गटांमधील आपसी संघर्ष, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात गोऱ्यांच्या वंश श्रेष्ठत्वाचा उघड पुरस्कार करणाऱ्या गटांना मिळणारा पाठींबा व यातून डोनाल्ड ट्रम्पसारख्या उजव्या विचाराच्या व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष पदावर झालेली निवड, भारतात रा.स्व. संघ प्रणीत उजव्या विचारांचे सरकार स्थापित झाल्यानंतर वाढीस लागलेले धार्मिक कलह या सर्व बाबी पाहता जग पुन्हा धार्मिक मूलतत्ववादाकडे वाटचाल करीत आहे असे स्पष्ट होते. रशियाच्या व चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर ७५ वर्षात जगातील निधर्मी लोकांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र अमेरिकेतील प्यू फॉउंडेशन या जगप्रसिध्द संस्थेच्या पाहणीनुसार जगातील निधर्मी लोकसंख्येत हळूहळू घट होत असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानातील बदल अत्यंत तीव्र गतीने होत आहे. यामुळे हे युग अतितीव्र तंत्रयुग ( Exponential Techno age ) म्हणून ओळखले जाते. या युगात नव्याने विकसित केलेले तंत्रज्ञान व्यवहारात वापरासाठी उपलब्ध होण्याच्या कालावधीही अत्यंत कमी झाला आहे. अतितीव्र तंत्रयुगात ( Exponential Techno age ) जागतिक मानवसमुहांचा कल धार्मिकतेचे आधुनिकीकरण ( Religionoized Modernity ) करण्याची संकल्पना स्वीकारत आहेत. या स्थितीत चीनमध्ये होत असलेला हा सांस्कृतिक बदल पाहिला तर आधुनिक काळात चीन केवळ आपल्या देशापुरताच नव्हे तर संपूर्ण जगाला बुद्धाच्या शांततापूर्ण सहजीवन आणि पर्यावरणपूरक भौतिक विकास या चिरंतन मूल्यांचे मार्गदर्शन करणारी जागतिक महासत्ता म्हणून स्थान प्राप्त करू शकतो.

सुनील खोबरागडे-9594057373
संपादक, दैनिक जनतेचा महानायक

Previous articleपालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची जनता भाजी बाजारास भेट
Next articleतळेगाव नगरपरिषद मा.नगरध्यक्ष मा.सुनिल अण्णा शेळके यांचा इंद्रपुरम सोसाटीतील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + 9 =